गणेशभक्तांसाठी जिल्हा बँकेचा ‘श्रीगणेशा’!, राष्ट्रीयकृत बँकांच्या संपामुळे होणारी गैरसोय टळणार! ; गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँक उद्या शनिवारी सुरू, अध्यक्ष मनीष दळवी यांचा ग्राहकहिताचा कौतुकास्पद निर्णय.

✍️रूपेश पाटील

सावंतवाडी : गणेश चतुर्थीच्या मंगलमय पर्वाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना आर्थिक व्यवहारांसाठी होणारी संभाव्य गैरसोय लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने उद्या, शनिवार दि. १२ सप्टेंबर रोजी सकाळच्या सत्रात बँक सुरू ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे गणेशोत्सवाच्या तयारीत असलेल्या जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सध्या राष्ट्रीयकृत बँकांचा संप सुरू असून, त्यातच उद्या शनिवार असल्याने राष्ट्रीयकृत बँकांना सुट्टी आहे. त्यानंतर रविवारची नियमित सुट्टी असल्याने सलग दोन दिवस बँकिंग व्यवहारांवर मर्यादा येणार होत्या. ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर रोख रक्कम, आर्थिक व्यवहार आणि अन्य बँकिंग कामांसाठी ग्राहकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता होती.

ही परिस्थिती ओळखून जिल्हा बँकेने ग्राहकहिताला सर्वोच्च प्राधान्य देत उद्या शनिवार दि. १२ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत बँकिंग सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गणेशभक्त, व्यापारी, शेतकरी तसेच अन्य ग्राहकांना आपल्या आर्थिक गरजा वेळेत पूर्ण करता येणार आहेत.

दरम्यान, मळेवाड उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते हेमंत मराठे यांनी गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेच्या ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी शनिवारच्या दिवशी बँक सुरू ठेवावी, अशी आग्रही मागणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्याकडे केली होती. त्यांच्या या मागणीची तत्काळ दखल घेत जिल्हा बँक प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतल्याने हेमंत मराठी यांनी अध्यक्ष मनीष दळवी यांचे व्यक्तिशः आभार मानले आहेत.

ग्राहकांची अडचण ओळखून सणाच्या दिवसांतही सेवा देण्याचा जिल्हा बँकेचा निर्णय हा निश्चितच ग्राहकाभिमुख आणि कौतुकास्पद असल्याची भावना जिल्ह्यातील ग्राहकांकडून व्यक्त होत आहे. गणरायाच्या आगमनापूर्वीच जिल्हा बँकेने ग्राहकांच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी उचललेले हे पाऊल म्हणजे खऱ्या अर्थाने ‘ग्राहकसेवेचा गणेशोत्सवी श्रीगणेशा’ ठरत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles