सावंतवाडी : ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहाशी जोडण्यासाठी पाटणकर एज्युकेशन ट्रस्ट – स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल, सावंतवाडी यांनी सामाजिक बांधिलकीचा आणखी एक आदर्श निर्माण केला आहे. खा. प. शाळा आंबेगाव म्हारकाटेवाडी या शाळेला संस्थेच्या वतीने अत्याधुनिक Wi-Fi Printer भेट देण्यात आला. या प्रिंटरच्या उद्घाटन सोहळ्यामुळे शाळेच्या शैक्षणिक वातावरणात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
‘ग्रामीण विद्यार्थ्यांनाही मिळावा आधुनिक शिक्षणाचा समान अधिकार’ या विचारातून देण्यात आलेली ही भेट केवळ एक उपकरण नसून, विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला आणि शैक्षणिक उपक्रमांना डिजिटल बळ देणारे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रम, प्रकल्प, सराव साहित्य, शैक्षणिक कागदपत्रे आदी कामांना यामुळे अधिक वेग आणि सुलभता मिळणार आहे.
पाटणकर एज्युकेशन ट्रस्टच्या संचालिका मा. सौ. कश्मिरा रुजुल पाटणकर यांच्या शुभहस्ते Wi-Fi Printer चे उद्घाटन करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञानाची गोडी निर्माण व्हावी, त्यांना आधुनिक शैक्षणिक साधनांचा प्रत्यक्ष वापर करता यावा आणि डिजिटल युगातील शिक्षणाच्या संधी त्यांच्या दारापर्यंत पोहोचाव्यात, या सामाजिक जाणिवेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी कोलगाव केंद्राचे केंद्रप्रमुख मा. श्री. संदिप निऊंगरे, BRC सावंतवाडीचे शिक्षक श्री. प्रसाद सांगेलकर, संस्था कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालकवर्ग तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. तसेच सन्माननीय ॲड. रुजुल पाटणकर सर आणि पाटणकर एज्युकेशन ट्रस्ट – स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल, सावंतवाडी यांनी शाळेची गरज ओळखून उपयुक्त Wi-Fi Printer उपलब्ध करून दिल्याबद्दल शाळेच्या वतीने कृतज्ञतापूर्वक आभार मानण्यात आले.
तंत्रज्ञानाच्या साथीने गुणवत्तापूर्ण शिक्षणाची वाटचाल!
ग्रामीण भागातील शाळांना अत्याधुनिक शैक्षणिक साधने उपलब्ध करून देणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्यात गुंतवणूक करण्यासारखे आहे. स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलने दिलेली ही भेट ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षितिजाला अधिक व्यापक करणारी ठरणार असून, ‘शहरातील सुविधा गावातील विद्यार्थ्यांनाही’ या संकल्पनेला बळ देणारी आहे.
या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमांना अधिक गती मिळणार असून, तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून शिक्षण अधिक सहज, आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण होण्यास मदत होणार आहे. पाटणकर एज्युकेशन ट्रस्टच्या या सामाजिक उपक्रमाचे पालक, ग्रामस्थ आणि शैक्षणिक क्षेत्रातून मनापासून कौतुक करण्यात आले.



