सावंतवाडीत उद्या रंगणार ५२ वर्षांची काव्यपरंपरा जपणारे कोजागरी कविसंमेलन! ; ज्येष्ठ कवी वीरधवल परब भूषविणार अध्यक्षस्थान, दोन उत्कृष्ट कवितांना वसंत सावंत स्मृती पुरस्कार!

सावंतवाडी : सिंधुदुर्ग साहित्य संघातर्फे श्रीराम वाचन मंदिरच्या सहयोगाने आयोजित करण्यात येणारे यंदाचे कोजागरी कविसंमेलन शनिवार, २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. ज्येष्ठ कवी वीरधवल परब संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असतील. श्रीराम वाचन मंदिरच्या कवी केशवसुत सभामंडपात सायंकाळी ५.३० वाजता होणाऱ्या या संमेलनात जिल्हाभरातील प्रथितयश आणि नवोदित कवी सहभागी होणार आहेत. संमेलनात सादर होणाऱ्या दोन उत्कृष्ट कवितांना कविवर्य वसंत सावंत स्मृती पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

सिंधुदुर्ग साहित्य संघातर्फे गेली ५२ वर्षे कोजागरी कविसंमेलनाची परंपरा जपली जात आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी आजवर विंदा करंदीकर, बा. भ. बोरकर, मंगेश पाडगावकर, दिलीप चित्रे यांच्यासह अनेक मान्यवर कवींनी भूषविले आहे. पूर्वी हे संमेलन आरपीडी हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित केले जात असे. आकाशवाणीवरूनही या संमेलनाचे प्रसारण केले जात होते.

यंदाच्या संमेलनाचे अध्यक्ष वीरधवल परब यांचे ‘मम् म्हणा फक्त’ आणि ‘दरसाल दरशेकडा’ हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. ‘गोमागणेश पितळी दरवाजा’ हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे. त्यांच्या कविता, समीक्षा आणि वैचारिक लेखन विविध नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाचा कवी केशवसुत पुरस्कार तसेच महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

या कविसंमेलनाच्या व्यासपीठावरून अनेक कवींनी आपल्या काव्यप्रवासाची सुरुवात केली आहे. दरवर्षी जिल्ह्यातील प्रस्थापित कवींसह नवोदित कवींनाही येथे आपल्या कविता सादर करण्याची संधी मिळते. यंदाही जिल्हाभरातील कवींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सिंधुदुर्ग साहित्य संघाचे अध्यक्ष लीलाधर घाडी, कार्याध्यक्ष विठ्ठल कदम आणि श्रीराम वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर यांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles