वेंगुर्ला : महिलांच्या अंगी असलेल्या कला, कौशल्य आणि उद्योजकीय क्षमतेला प्रोत्साहन देत त्यांना स्वावलंबनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने इनरव्हील क्लब वेंगुर्ला आणि लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशन, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लक्ष्मी आधार’ भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सव २०२६ आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार, दिनांक ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत साई मंगल कार्यालय, वेंगुर्ला येथे हा महोत्सव रंगणार आहे.
महिलांनी स्वतःच्या मेहनतीतून आणि कल्पकतेतून तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या व्यवसायाला चालना देणे आणि स्थानिक महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.
या प्रदर्शनामध्ये आकर्षक हस्तकला व गृहउपयोगी वस्तू, महिलांनी तयार केलेली विविध उत्पादने तसेच रुचकर आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांची रेलचेल अनुभवायला मिळणार आहे. स्थानिक महिलांच्या कल्पकतेचा, मेहनतीचा आणि उद्योजकीय जिद्दीचा हा अनोखा आविष्कार ठरणार आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन सौ. वेदिका विशाल परब यांच्या हस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणून सौ. संध्या तेरसे (अध्यक्ष, नर्मदा आई संस्था) उपस्थित राहणार आहेत. यावेळी विशेष आकर्षण म्हणून १० महिला उद्योजिकांचा त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान करण्यात येणार आहे.
प्रदर्शन व विक्री महोत्सवाची वेळ सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत असून नागरिकांना तीन दिवस या प्रदर्शनाचा आनंद घेता येणार आहे. स्टॉल नोंदणीसाठी ज्योती देसाई (९४२०२५८७७७) आणि वृंदा गाडगेंदकर (९८२३१७८७७८) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
‘महिला उद्योजिकांना प्रोत्साहन द्या, त्यांच्या कष्टाला बाजारपेठ मिळवून द्या!’ या सकारात्मक संदेशातून आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव केवळ खरेदी-विक्रीचा उपक्रम नसून महिलांच्या स्वप्नांना बळ देणारा, त्यांच्या आत्मविश्वासाला नवी उभारी देणारा आणि महिला सक्षमीकरणाला चालना देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे.
महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंच्या खरेदीचा आनंद लुटण्याबरोबरच स्थानिक महिला उद्योजिकांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी वेंगुर्ला आणि परिसरातील नागरिकांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



