बांदा : बांदा पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनात्मक आणि सामाजिक वाटचालीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेल्या ज्येष्ठ नागरिक विचार मंचाच्या निवडणुकीत श्री देव बांदेश्वर आघाडीने विजयाची एकहाती मोहर उमटवली आहे. मंचाच्या ११ जागांसाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत आघाडीच्या सर्वच्या सर्व ११ उमेदवारांनी विजयश्री खेचून आणत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. या निकालामुळे आगामी कार्यकारिणीत श्री देव बांदेश्वर आघाडीचेच वर्चस्व राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महिला राखीव गटातून निकिता मोरजकर यांनी तब्बल १५५ मते मिळवत सर्व उमेदवारांमध्ये सर्वाधिक मतांचा बहुमान पटकावला, तर पुरुष गटात गुरुनाथ नार्वेकर आणि जगन्नाथ सातोस्कर यांनी प्रत्येकी १५४ मते मिळवत आपली ताकद दाखवून दिली.
बांदा ग्रामपंचायतीच्या सभागृहात सकाळी ८ ते दुपारी १२.३० या वेळेत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. एकूण २९२ मतदारांपैकी १८६ ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे निवडणुकीत ६३ टक्के मतदानाची नोंद झाली. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी पार पडली आणि निकाल जाहीर होताच श्री देव बांदेश्वर आघाडीच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.
पुरुष गटात आघाडीच्या नऊही उमेदवारांची बाजी!
पुरुषांच्या नऊ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत श्री देव बांदेश्वर आघाडीकडून महादेव बांदेकर यांनी १४१, हरिश्चंद्र भिसे यांनी १४३, उत्तम देसाई यांनी १४१, भिकाजी धुरी यांनी १३६, हनुमंत मालवणकर यांनी १४४, गुरुनाथ नार्वेकर यांनी १५४, जगन्नाथ सातोस्कर यांनी १५४, प्रकाश शिर्के यांनी १४२, तर महादेव वसकर यांनी १४१ मते मिळवून विजय संपादन केला.
अपक्ष उमेदवारांमध्ये महादेव सावंत यांना ५९, सुकाजी गावडे यांना ४५, तर अशोक परब यांना ३३ मते मिळाली. पुरुष गटातील नऊही जागांवर आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व अधोरेखित केले.
महिला गटात निकिता मोरजकर यांची मतांची आघाडी!
महिला राखीव गटातील निवडणुकीतही श्री देव बांदेश्वर आघाडीने आपले यश कायम राखले. निकिता मोरजकर यांनी १५५ मते मिळवत सर्व उमेदवारांमध्ये सर्वाधिक मते मिळविण्याचा मान पटकावला. अर्चना सावंत यांनी १४९ मते मिळवून विजय संपादन केला. अपक्ष उमेदवार अनुराधा मोर्ये यांना ३३ मते मिळाली.
मतमोजणीदरम्यान सर्वसाधारण गटातील १७, तर महिला गटातील १२ मते बाद ठरली.
निवडणूक प्रक्रियेत उत्स्फूर्त सहभाग!
ज्येष्ठ नागरिक विचार मंचाच्या या निवडणुकीकडे बांदा पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिकांचे विशेष लक्ष लागून होते. मतदान प्रक्रियेत मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित लोकशाही प्रक्रियेवरील आपला विश्वास अधोरेखित केला. सर्व ११ जागांवर श्री देव बांदेश्वर आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळविल्याने आगामी काळात मंचाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न, विचार आणि सामाजिक उपक्रमांना कोणती दिशा मिळते, याकडे पंचक्रोशीचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पृथ्वीराज बांदेकर यांनी काम पाहिले.



