तळकोकणातील जत्रोत्सवांचा मंगलमय बिगुल शनिवारपासून! – आवळेगावच्या श्री देव नारायण मंदिरात २१ नोव्हेंबरला कार्तिकी एकादशीचा पारंपरिक ‘दहीकाला’. ; पालखी सोहळा, हरिपाठ अन् दशावतारी नाटकाची रंगणार मेजवानी!

आवळेगाव : दिवाळीच्या मंगलमय पर्वाची सांगता होताच तळकोकणातील ग्रामदैवतांच्या चरणी नतमस्तक होण्याचा आणि भक्ती, श्रद्धा व लोकसंस्कृतीचा अनोखा संगम अनुभवण्याचा काळ सुरू होतो. गावोगावच्या जत्रोत्सवांनी कोकणची भूमी भक्तिरसात न्हाऊन निघते. याच पारंपरिक जत्रोत्सवांच्या हंगामाचा पहिला मंगलमय शंखनाद कुडाळ तालुक्यातील आवळेगाव येथील ग्रामदैवत श्री देव नारायण यांच्या चरणी होणार आहे. कार्तिकी प्रबोधिनी एकादशीच्या पावन पर्वावर शनिवार, दि. २१ नोव्हेंबर २०२६ रोजी मंदिरात पारंपरिक ‘दहीकाला’ जत्रोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात येणार आहे.

या जत्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार असून, श्रींच्या दर्शनासाठी आणि उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची मांदियाळी जमणार आहे. अभिषेक, दिंडी, हरिपाठ, पालखी प्रदक्षिणा आणि रात्री रंगणारे दशावतारी नाटक अशा भक्तीमय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी आवळेगाव नगरी दुमदुमून जाणार आहे.

धार्मिक कार्यक्रमांची मांदियाळी; रात्री पालखी सोहळ्याचा भक्तिमय थाट!

जत्रोत्सवाच्या दिवशी सकाळी ८ वाजता श्रींच्या मूर्तीवर अभिषेक करून उत्सवाचा मंगलारंभ होईल. सकाळी १० वाजता विठ्ठल-रखुमाई मंदिर ते श्री देव नारायण मंदिर अशी पायी दिंडी काढण्यात येणार आहे. सायंकाळी ५ वाजता हरिपाठाचा भक्तिमय सोहळा रंगणार आहे. त्यानंतर रात्री ११.३० वाजता श्रींची पालखी प्रदक्षिणा होणार असून, रात्री १२.३० वाजता खानोलकर दशावतार कंपनीचे पारंपरिक दशावतारी नाटक अर्थात ‘दहीकाला’ सादर होणार आहे.

श्री देव नारायण मंदिराशेजारी असलेल्या श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरातही कार्तिकी प्रबोधिनी एकादशीनिमित्त विविध धार्मिक उत्सव साजरे करण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील जत्रोत्सव हंगामाचा पहिला मान आवळेगावला!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जत्रोत्सवांच्या हंगामातील पहिली यात्रा म्हणून आवळेगावच्या दहीकाल्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे आवळेगावसह दशक्रोशीतील ग्रामस्थ, जिल्हाभरातील भाविक आणि दशावतारी कलेचे चाहते या यात्रेला आवर्जून उपस्थित राहतात. जत्रोत्सवाच्या निमित्ताने गावातील प्रत्येक घर सडा-रांगोळ्यांनी सजविले जाते. अंगणातील रांगोळ्या, मंदिरातील दीपोत्सव, पालखीचा गजर आणि दशावतारी नाटकाची रंगत यामुळे संपूर्ण गावात उत्साहाचे आणि मांगल्याचे वातावरण निर्माण होते.

मुंबई, पुणे तसेच परदेशात नोकरी-व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले आवळेगावचे चाकरमानीही या वार्षिक जत्रोत्सवासाठी आवर्जून गावाकडे परततात. त्यामुळे ही यात्रा केवळ धार्मिक सोहळा न राहता गावाच्या मातीशी नाळ जोडणारा, नात्यांची वीण घट्ट करणारा आणि परंपरेचे जतन करणारा भावनिक मिलनसोहळाही ठरतो.

तुळशी विवाहाची चाहूल; उसांच्या वाडांना मागणी!

या जत्रोत्सवानंतर दुसऱ्याच दिवसापासून तुळशी विवाह सोहळ्यांना प्रारंभ होत असल्याने परिसरात धार्मिक उत्साहाला आणखी उधाण येते. तुळशी विवाहासाठी आवश्यक असलेल्या उसांच्या वाडांना मोठी मागणी असते. त्यामुळे या काळात बाजारपेठेत उसांच्या वाडांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी तुळशी विवाह साजरा करण्यात येणार आहे.

अशा प्रकारे श्री देव नारायण यांच्या चरणी नतमस्तक होत आवळेगावच्या दहीकाल्याने सिंधुदुर्गातील वार्षिक जत्रोत्सवांच्या पर्वाला सुरुवात होणार आहे. श्रद्धा, परंपरा, दशावतारी लोककला आणि गावच्या मातीशी असलेले अतूट नाते यांचा सुंदर आविष्कार अनुभवण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मानकरी, देवस्थान कमिटी आणि आवळेगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles