सावंतवाडी : शिक्षण क्षेत्रात आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवणारा सिंधुदुर्ग जिल्हा आता आरोग्य क्षेत्रातही राज्यात अव्वल स्थान पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाची विकासाभिमुख वाटचाल सुरू असून राज्यस्तरावर सिंधुदुर्ग जिल्ह्याची दखल घेतली जात आहे. ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी अभियानातही जिल्हा आघाडीवर राहील, असा ठाम विश्वास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी व्यक्त केला. सावंतवाडी तालुक्याने या अभियानात प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी कंबर कसली असून, या प्रयत्नांना जिल्हा परिषदेचे सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
सावंतवाडी येथील बॅ. नाथ पै सभागृहात आयोजित ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ या तालुकास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना बीजांचे वाटप करून वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. त्याचबरोबर तालुक्यात माकडतापाचे रुग्ण आढळून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर या आजाराबाबत जनजागृती मोहिमेचाही शुभारंभ करण्यात आला.
या अभियानांतर्गत सावंतवाडी तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींचा संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून सहभाग नोंदविण्यात येणार आहे. गावागावांत स्वच्छता, आरोग्यविषयक सुविधा, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि लोकसहभाग यांची प्रभावी सांगड घालत आरोग्यदायी ग्रामसंस्कृती निर्माण करण्याचा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी आयोजित कार्यशाळेत सरपंच, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी तसेच विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
६५.२५ कोटींच्या पुरस्कारांची आरोग्यदायी पर्वणी!
‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांना राज्य, विभागीय व जिल्हास्तरावर विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे. ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या ग्रामपंचायतींना ‘आरोग्य संपन्न ग्राम’ म्हणून घोषित केले जाणार आहे. जिल्हास्तरीय मूल्यांकनात प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्या ग्रामपंचायतींना ‘आरोग्य प्रेरणा ग्राम’, विभागीय स्तरावर ‘आरोग्य गौरव ग्राम’, तर राज्यस्तरावर ‘आरोग्य भूषण ग्राम’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या विविध पुरस्कारांच्या माध्यमातून तब्बल ६५.२५ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम वितरित करण्यात येणार असल्याने गावागावांत आरोग्यविषयक स्पर्धेचे नवे पर्व सुरू झाले आहे.
आरोग्याच्या स्पर्धेत उतरायचे तर लोकसहभागाची ताकद वाढवा!
आपल्या मनोगतात जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत म्हणाले की, आरोग्याच्या या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी केवळ शासकीय यंत्रणेच्या प्रयत्नांवर अवलंबून राहून चालणार नाही. गावाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून लोकसहभागाची चळवळ उभी करणे आवश्यक आहे. ‘माझं गाव नंबर एक असलं पाहिजे’ ही जिद्द प्रत्येक ग्रामपंचायतीने मनाशी बाळगून कामाला लागावे. डेंग्यू, माकडताप यांसारख्या आजारांचे आव्हान आपल्यासमोर असले, तरी योग्य जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि सामूहिक प्रयत्नांच्या बळावर त्यावर मात करता येईल.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मॉडेल संपूर्ण महाराष्ट्रात चर्चिले जाईल, असा विश्वास व्यक्त करताना त्यांनी शिक्षण क्षेत्राप्रमाणेच आरोग्य क्षेत्रातही जिल्ह्याने अव्वल स्थान मिळवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. सावंतवाडी तालुका प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी तालुक्यातील सर्व घटकांनी मेहनत घेतली असून, या ध्येयपूर्तीसाठी जिल्हा परिषदेचेही सहकार्य राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.
दीडशे ग्रामपंचायतींची ७० टक्क्यांपुढे झेप!
आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनीही या अभियानाबाबत सकारात्मक भूमिका मांडली. ते म्हणाले की, ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानात सिंधुदुर्ग जिल्हा निश्चितच उल्लेखनीय कामगिरी करेल. आरोग्य विभागाने या दिशेने चांगले काम केले असून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, आशा सेविका, अधिकारी आणि कर्मचारी या अभियानात सक्रियपणे सहभागी झाले आहेत. जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींपैकी जवळपास १५० ग्रामपंचायतींनी आतापर्यंत ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत. ही जिल्ह्यासाठी निश्चितच समाधानाची आणि अभिमानाची बाब आहे.
वेंगुर्ला आणि सावंतवाडी येथे तालुकास्तरीय कार्यशाळा पार पडल्या असून, आगामी काळात जिल्हास्तरीय कार्यशाळेचेही आयोजन करण्यात येणार आहे. संपूर्ण जिल्ह्याने एकजुटीने प्रयत्न करून या अभियानात अव्वल स्थान मिळवावे, यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध आहे. माकडतापासारख्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांनाही प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी सभापती सुस्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक, गटविकास अधिकारी निलेश जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश कर्तसरकर आदींनीही मनोगत व्यक्त करून अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, सभापती सुस्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक, गटविकास अधिकारी निलेश जाधव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी, जिल्हा परिषद सदस्य सुधा कवठणकर, पंचायत समिती सदस्य जितेंद्र गांवकर, मायकल डिसोझा, स्नेहा टिळवे, प्रियांका देसाई, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश कर्तसरकर, जिल्हा पर्यवेक्षक शंकर परब यांच्यासह विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गाव निरोगी तर समाज सुदृढ, समाज सुदृढ तर जिल्हा समृद्ध! या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड देत सावंतवाडी तालुक्याने आरोग्याच्या महास्पर्धेत विजयाचा निर्धार केला आहे. आता गावागावांतील लोकसहभाग, आरोग्य यंत्रणेची कार्यतत्परता आणि प्रशासनाची साथ यांच्या बळावर सिंधुदुर्ग जिल्हा राज्याच्या आरोग्य नकाशावर मानाचे स्थान मिळविणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



