सावंतवाडी : ओंकार हत्तीला वनतारा येथे पाठवण्याच्या निर्णयाला सत्ताधाऱ्यांचा डाव संबोधणाऱ्या जयेंद्र परुळेकर यांच्या भूमिकेवर निरवडे येथील नुकसानग्रस्त शेतकरी अमेय पै यांनी जोरदार प्रहार केला आहे. “शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची राखरांगोळी होत असताना आणि त्यांच्या डोळ्यांत अश्रू असताना पर्यावरणाच्या गप्पा मारणाऱ्यांना शेतकऱ्यांच्या वेदना कशा कळणार?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
तथाकथित पर्यावरणवादी म्हणून मिरवणाऱ्या जयेंद्र परुळेकर यांनी आजवर पर्यावरण संवर्धनासाठी नेमके काय ठोस कार्य केले? असा सवाल करत पै यांनी त्यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पर्यावरणाच्या नावाखाली स्वतःचे हितसंबंध जपण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी आधी शेतकऱ्यांच्या नुकसानीची जबाबदारी स्वीकारावी. ओंकार हत्तीला वनतारा येथे पाठवण्यास त्यांचा नेमका विरोध कशासाठी? शेतकऱ्यांच्या हितापेक्षा दुसरे कोणते हित त्यांना महत्त्वाचे वाटते? असा सवालही त्यांनी केला.
अंबानींना विरोध करायचा आणि दुसरीकडे त्यांच्याच लग्नसोहळ्यात ठुमके लावायचे, अशी त्यांच्या नेत्याची दुटप्पी भूमिका आहे. त्याच धर्तीवर परुळेकर यांची भूमिकाही दुटप्पी असल्याचा घणाघाती आरोप अमेय पै यांनी केला.
गेल्या दोन महिन्यांत ओंकार हत्तीने परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला असून अनेक वाहनांचे नुकसान करण्यासोबतच शेतकऱ्यांच्या भातशेतीचा, नारळ आणि केळीच्या बागायतींचा मोठ्या प्रमाणात फडशा पाडला आहे. कष्टाने उभे केलेले पीक एका रात्रीत उद्ध्वस्त होते, वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरते आणि संसाराचा आर्थिक डोलारा कोसळतो. या संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांचे दुःख, त्यांचे अश्रू आणि त्यांच्या कुटुंबीयांची होणारी परवड पर्यावरणाच्या नावाने आंदोलन करणाऱ्यांना कशी दिसत नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
शेतकऱ्यांची नुकसानभरपाई देण्याची तयारी असेल तरच विरोधाला अर्थ!
जर जयेंद्र परुळेकर आणि त्यांच्यासारख्या तथाकथित पर्यावरणवाद्यांना ओंकार हत्तीला वनतारा येथे पाठवण्यास विरोध करायचा असेल, तर त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची तयारी दाखवावी. शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्याची जबाबदारी स्वीकारल्याशिवाय केवळ पर्यावरणाच्या नावाखाली विरोध करणे कितपत योग्य आहे? असा थेट सवाल अमेय पै यांनी केला.
पालकमंत्री नितेश राणे यांच्याविरोधात राजकीय स्वार्थातून आरोप करण्यापेक्षा त्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या मदतीचीही दखल घ्यावी. पालकमंत्री नितेश राणे यांनी वेळोवेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजकारण करण्याऐवजी त्यांच्या वेदना समजून घेणे अधिक गरजेचे असल्याचे पै म्हणाले.
“आम्हाला राजकारण नको, आमच्या शेतीचे आणि संसाराचे संरक्षण हवे!”
ओंकार हत्तीला वनतारा येथे न्या, अन्यथा त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासातील हत्तींच्या कळपात सोडण्याची व्यवस्था करा; पण सर्वसामान्य शेतकऱ्यांना दररोजच्या या भीतीतून आणि नुकसानीच्या सत्रातून मुक्त करा. आमच्या कष्टाची शेती वाचवा, आमच्या संसाराचा आधार वाचवा. पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे आहेच; मात्र माणसाच्या जगण्यालाही तितकेच महत्त्व आहे. शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, अशी आर्त आणि भावनिक साद निरवडे येथील नुकसानग्रस्त शेतकरी अमेय पै यांनी घातली आहे.



