वैभववाडी : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दि. ८ मार्च रोजी आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील मराठी, हिंदी आणि इंग्रजी विभागांच्या संयुक्त विद्यमाने “मराठी, हिंदी आणि इंग्रजी साहित्यातील महिलांचे चित्रण आणि सबलीकरण” या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत देशभरातील शैक्षणिक संस्थांमधील प्राध्यापक, संशोधक, साहित्यप्रेमी आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यावेळी साहित्य आणि स्त्री अध्ययन क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ आपले विचार मांडणार आहेत. या परिषदेत साहित्य, समाज आणि स्त्रीवादी विचारधारा यांचा परस्परसंबंध उलगडून दाखवणारे संशोधनप्रबंध सादर केले जाणार आहेत. या परिषदेचे उद्दिष्ट साहित्याच्या माध्यमातून महिलांच्या सशक्तीकरणास चालना देणे हे आहे. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. नामदेव गवळी यांनी शैक्षणिक संस्थांमधील प्राध्यापक, संशोधक, साहित्यप्रेमी आणि विद्यार्थी यांना या परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या मराठी, हिंदी आणि इंग्रजी विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाने केले आहे.