रामकृष्ण परमहंसांच्या जयंतीच्या निमित्ताने…!
कालीमातेचे भक्त, भारतातील विविध संप्रदायांची साधना करणारे, एवढेच नव्हे तर इस्लाम व ख्रिश्चन धर्माप्रमाणे साधना करून जीवनमुक्त आयुष्य जगणारे ‘परमहंस’ अशी रामकृष्ण परमहंसांची ओळख आपल्याला आहे.
पण माझ्या मनात सतत आठवणीत राहिलेली रामकृष्णांची गोष्ट म्हणजे त्यांनी दक्षिणेश्वरचे कालीमंदिर बांधणाऱ्या राणी रासमणींचे जावई मथूरबाबूंसमवेत केलेली तीर्थयात्रा. या यात्रेत ते वैद्यनाथाचे दर्शन घ्यायला जेव्हा देवघर क्षेत्री पोचले तेव्हा तेथील लोकांचे दारिद्र्य पाहून रामकृष्ण मथूरबाबूंना म्हणाले, ‘जगन्मातेने तुम्हाला भरपूर दिले आहे. इथे तिच या दरिद्री लोकांच्या रुपाने नांदते आहे. या सर्वांना एकवेळचे पोटभर जेवण द्या आणि वस्त्र द्या!’
मथूरबाबू म्हणाले, ‘या सर्व लोकांच्या अन्नवस्त्रासाठी भरपूर पैसे खर्च होतील. तसा खर्च केला तर आपली यात्रा पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे पैसे उरणार नाहीत.’
रामकृष्ण म्हणाले, ‘आई इथे उपाशी दिसत असताना तिला तसेच ठेवून मी पुढे येऊ इच्छित नाही. मी राहतो इथेच या लोकांसोबत. मी त्यांचे दुख थोडेसेही हलके करु शकत नसेन, तर त्यांच्यासमवेत मी स्वतःही ते अनुभवतो. तुम्ही जा पुढे वाराणशीला.’ असे म्हणून ते त्या दरिद्री लोकांत जाऊन बसले.
शेवटी मथूरबाबूंनी कलकत्याहून पैसे मागवून घेतले आणि त्या सर्वांना अन्न वस्त्र देऊनच ते पुढच्या तीर्थक्षेत्री गेले.
विष्णुमय जग पाहू शकणारे रामकृष्ण स्वतः मात्र पैशाचा कमालीचा तिटकारा बाळगत. ‘पैसा’ हे मोहाचे द्वार आहे अशी त्यांची पक्की श्रद्धा होती. मथुरबाबू वारल्यानंतर रामकृष्णांच्या रोजच्या गरजांकडे कोणाचे लक्ष राहीले नव्हते. एकदा रामकृष्णांचे एक व्यापारी भक्त लक्ष्मीनारायण दक्षिणेश्वरी त्यांना भेटायला आले. त्यावेळी त्यांच्या खाटेवरची चादर त्यांना मळलेली दिसली. त्यावरुन रामकृष्णांचे आबाळ होत आहेत हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी रामकृष्णांना काही पैसे देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर आपण विरक्त, धनसंचय करु शकत नाही तेव्हा आपण पैसे घेणार नसल्याचे रामकृष्णांनी स्पष्टच सांगून टाकले. तेव्हा त्या भक्ताने रामकृष्णांच्या नकळत सारदादेवींच्या नावावर पैसे ठेवण्याचा प्रयत्न केला. पण सारदादेवींनीही त्याला स्पष्टच नकार दिला. लक्ष्मीनारायण रामकृष्णांना पुन्हा पुन्हा आग्रह करु लागले तेव्हा वैतागून रामकृष्ण म्हणाले, ‘आई, तू असल्या लोकांना माझ्याकडे पाठवतेसच का ग? धनसंचयाचे प्रलोभन दाखवून हे लोक मला तुझ्यापासून दूर नेऊ पाहतात.’ त्यावर लक्ष्मीनारायण यांच्याकडे माफी मागण्यापलिकडे पर्यायच उरला नाही.
करुणा आणि वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रामकृष्ण. तोच आदर्श आमच्या पुढ्यात ठेवण्यासाठी ते या पृथ्वीतलावर लीला करुन गेले.
आजच्या क्रोर्य आणि स्वार्थाने लडबडलेल्या जगात मनाला सातत्याने योग्य वाटेवर ठेवण्यासाठी रामकृष्णांच्या लीलांचे सतत चिंतन मला आवश्यक वाटते.
…..
डाॅ. रुपेश पाटकर.
ADVT –
सोने तारण कर्ज योजना.! – सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, यांची अभिनव योजना.