Monday, June 16, 2025

Buy now

spot_img

किर्ती रात्रशाळेत ‘स्वातंत्र्यदिन-संध्या’ समारंभाचे आयोजन.!

मुंबई: प्रगती मंडळ संचालित किर्ती नाईट हायस्कूल, शिवडी येथे भारताच्या ७८ वा स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्यदिन-संध्या कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमास आर्थिक गुन्हा शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचीन मुरारी कदम व मुंबईतील नामवंत कोचिंग क्लासेसचे संचालक व विशेष कार्यकारी अधिकारी सुधाकर कृष्णाजी कदम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

प्रत्येकाने विद्यार्थी दशेत आपल ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत असे सचिन कदम सर यांनी सांगितले. मी सामान्य मध्यमवर्गातील मुलगा ५ वीत असतानाच पी. एस्. आय. होण्याचं स्वप्न उराशी बाळगले होते. पुढे महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या परिक्षेचा अभ्यास करून यशस्वी झालो. तुम्हीही जिद्दीनं शालांत परिक्षा पास होवून न थांबता पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण करा. तुम्ही प्रौढ विद्यार्थी आहात, चांगले विचार करा, चांगली संगत धरा तसेच दारू, ड्रग्स इ. व्यसनापासून दूर रहा, यश नक्कीच मिळेल. सचिन कदम सरांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या व शिक्षक व संस्थाचालक हा रात्रशाळेचा उपक्रम गेली ४३ वर्षे राबवीत असल्याबद्दल अभिनंदन केले.

तुम्ही विद्यार्थी खूप हुशार व मेहनती आहात हे तुमच्या देहबोलीतून लक्षात येत आहे अस बोलून दहावी परीक्षा पास होण तुम्हाला सहज शक्य आहे असा विश्वासच मुंबई पश्चिम उपनगरात शिक्षणाचे जाळे पसरविलेल्या सरस्वती कोचिंग क्लासेसचे संचालक सुधाकर कदम यांनी विद्यार्थ्यांना दिला. यापुढे पदवी पर्यंत शिकणं आवश्यक आहे. वेळेचं नियमन करून सुरूवातीपासून अभ्यास करा. विषयवार मार्गदर्शन करण्यासाठी सरस्वती कोचिंग क्लासेसचे शिक्षक नेहमीच उपलब्ध असतील असे आश्वासन सुधाकर कदम यांनी विद्यार्थ्यांना दिले व मुख्याध्यापकांकडे १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य सुपूर्द केले.

या कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. शाळेच्या विद्यार्थिनीनी सरस्वती वंदना, स्वागतगीत व एक कोळी नृत्य सादर केले. मुख्याध्यापक शिवाजी आव्हाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. १५० वर्षाच्या ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून, अनन्वीत अत्याचारापासून आपणांस स्वातंत्र्य मिळवून देणार्‍या स्वतंत्रसेनानींच पुण्यस्मरण करण्याचा आजचा दिवस असे सांगून संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत शिंदे यांनी ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यकमास संस्थेचे विश्वस्त हरिश्चंद्र शिंदे उपस्थित होते. शाळेचे शिक्षक गोरख इंगोले यांनी खुमासदार सूत्रसंचालन केले तर सत्यविजय डामरे यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीताने या दिमाखदार सोहळ्याचा समारोप करण्यांत आला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles