Wednesday, June 18, 2025

Buy now

spot_img

शाश्वत ग्रामविकासाचे ‘भगिरथ’चे कार्य प्रेरणादायी ! : खा. नारायण राणे. ; गोरगरीब जनतेच्या उत्कर्षासाठी कार्यरत या संस्थेला सदैव देणार साथ, झाराप येथील भगिरथ संस्थेला भेट देत घेतला कार्याचा आढावा.

सावंतवाडी : जनतेच्या हितासाठी काम करणार सरकार हे लोकांच्या करातून मिळालेल्या उत्पन्नातून काम करतं. मात्र, गेली २५ वर्षे केवळ लोकहिताचे कार्य करणारी एखादी संस्था चालवणं ही सोपी गोष्ट नाही. समाज आणि समाजातील गरीब माणसं डोळ्यासमोर ठेवून ही संस्था काम करीत आहे. हे काम नसून कार्य आहे. शाश्वत ग्रामविकासासाठी सुरु असलेलं भगिरथं प्रतिष्ठानचं हे कार्य निश्चितच प्रेरणादायी असून सिंधुदुर्गातील गोरगरीब जनतेचं जिवनमानं उंचावण्यासाठी काम करणाऱ्या व गरीबांना अन्नाचा आधार देणाऱ्या या संस्थेला भविष्यात काहीही कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी दिली.

ते म्हणाले, डॉ. प्रसाद देवधर व त्यांच्या भगिरथ प्रतिष्ठानचं नाव मी बरीच वर्ष ऐकून होतो. आज प्रत्यक्ष भेटून भगिरथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून डॉ. प्रसाद देवधर व त्यांचे सर्व सहकारी करीत असलेलं कार्य जवळून पाहता आलं. भगिरथचं हे काम काम नसून समाज हिताचं कार्य आहे. खरं तर त्यांची व माझी भेट फार उशिरा झाली. ही भेट आधीच झाली असती तर जिल्ह्याच्या विकासात वेगळी क्रांती घडली असती. मात्र, आता ही साथ कायम असून भगिरथच्या कार्याला सर्वतोपरी सहकार्य करणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


या संस्थेच्या कार्याचं मूल्यमापनं करणं यापेक्षा या संस्थेच्या कार्यातून होत असलेलं सर्वसामान्य जनतेचं व पर्यायाने आपल्या जिल्ह्याचं हितं हेच महत्वाचं आहे. येथील कार्यकर्त्यांमध्ये विश्वास ओतप्रोत भरलेला दिसून येतो व हा आत्मविश्वासचं माणसाला यशस्वी करतो. त्यामुळे संस्थेच्या या कार्याचा प्रचार व प्रसार होणेही आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
माणूस हा जन्मापासून मृत्यूपर्यंत कायम विद्यार्थीच असतो. जीवनात विविध माध्यमातून ज्ञान हे मिळतचं असतं. आज देवधर यांच्या माध्यमातून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. माझ्या गो शाळेतील कर्मचाऱ्यांना येथील प्रशिक्षणार्थींनी मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या जिल्ह्यात बहुसंख्य हिंदू राहतात. मात्र, येथील चालिरीती, संस्कार, प्रगती, उपकारांची जाणीव या संदर्भात मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. जाती पातीचं, शिक्षणाचं मोठं अवडंबर येथे केलं जातं. हलकी कामं करण्याची लाज बाळगली जाते. काहीही न करता केवळ प्रसिद्धीची हौस असल्याने प्रगती खुंटते. अशा लोकांना भगिरथं सारख्या सेवा भावी व कार्यशील संस्थांच्या मार्गदर्शनाची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मी देखील गरीब कुटुंबात जन्माला आलो. मुंबईत मामाकडे राहून शिक्षण घेतलं. नोकरी करत असतानाच कोणताही अनुभव नसताना चिकन शॉपच्या माध्यमातून व्यवसायात पदार्पण केलं व एक यशस्वी उद्योजक ठरलो. बाळासाहेब म्हणायचे, मनाची श्रीमंती ठेव. गरीबीवर मात करण्यासाठी बुद्धिमत्ता, मेहनत व वेळेची सांगड घालून काम केल्यास यश नक्कीच मिळतं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारण व व्यवसायातही यशस्वी झालो. आज देवधराचं काम पाहून त्यांच्या धाडसाचे कौतुक वाटले. शुन्यातून त्यांनी निर्माण केललं हे साम्राज्य व कार्याचा वटवृक्ष अधिकच मोठा होण्यासाठी सदैव साथ देईन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सुरुवातीला झाराप सरपंच दक्षता मेस्त्री यांनी खा. नारायण राणे यांच्यासह सौ. निलमताई राणे यांचं स्वागत केलं.
यावेळी डॉ. प्रसाद देवधर यांनी संस्थेच्या एकूणच कार्याचा आढावा घेत लेखाजोखा मांडला. सुरुवातीला त्यांनी भगीरच्या एकंदरीत कार्याची माहिती देणारी डॉक्युमेंटरी सादर केली. त्यानंतर भगिरथच्या या कार्यात सहकार्य करणाऱ्या सहकाऱ्यांचा परिचय करून देत त्यांचे कार्य व अनुभव देखील खा. नारायण राणे यांच्या समोर कथन केले.
यावेळी डॉ. देवधर म्हणाले, जिल्ह्याच्या विकासात खा. नारायण राणे यांचं फार मोठं योगदान आहे. प्रशासनावर त्यांची कमांड आहे. नियोजनची बैठक त्यांच्या नजरेवर चालते. असे नेतृत्व असल्यावर प्रशासन पळते. त्यामुळे प्रतिष्ठानसाठी खा. नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा बँक अध्यक्ष, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची एक संयुक्त बैठक व्हावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी व जिल्हा बँकेचे प्रतिष्ठानच्या ग्राम विकासाच्या वाटचालित नेहमीच सहकार्य असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी डॉ. हर्षदा देवधर यांनी भगिरथच्या शाश्वत ग्राम विकासाची संकल्पना मांडली. भगिरथ योग्य वाटेवर काम करत असताना खा. नारायण राणे यांचे आशिर्वाद लाभले हे आमचे भाग्य असल्याचे त्या म्हणाल्या. अवधूत देवधर यांनीही भगिरथच्या कार्याचे स्वरूप स्पष्ट केले. यावेळी जेष्ठ मूर्तीकार विलास मळगांवकर यांनी ‘गोमय गणपती ‘ मागची भुमिका विषद केली. तर प्रतिष्ठानचे कार्यकर्ते संतोष तेली, विकास धुरी, पप्पू ठिकार, दीपक सामंत, नारायण चेंदवणकर, संतोष झारापकर, अभय परब, अंकुश माजगांवकर, संजय झारापकर, मनिषा धुरी, रविंद्र प्रभू देसाई, नवीन मालवणकर यांनीही आपल्या विभागातील कार्याची माहिती दिली.

*राजसत्ता व ऋषीसत्ता यांचा संगम जिल्ह्याच्या विकासासाठी सुवर्णक्षण : डॉ. मिलिंद कुलकर्णी*

खासदार नारायण राणे यांचं भगिरथ प्रतिष्ठान संस्थेत येणं म्हणजे आश्रमात एखाद्या चक्रवर्ती राजाने आपल्यासारखेच आहे. खा. राणे मॅक्रो लेव्हलला काम करत आहेत तर भगिरथ व डॉ. प्रसाद देवधर हे मायक्रो लेव्हलला काम करत आहेत. एकीकडे राज्याच्या व देशाच्या विकासासाठी राणे यांचं कार्य तर ग्रामाविकासासाठी आयुष्य झोकून काम करत असलेले डॉ. देवधर यांची भेट म्हणजे जिल्ह्याच्या विकासाची नांदी ठरेल. राजसत्ता व ऋषी सत्तेचा हा संगम जिल्ह्याच्या गतिमान विकासासाठी पुढचं पाऊल ठरेल, असा विश्वास डॉ. मिलींद कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles