कबीरदासांची शिकवण आजही उपयुक्त ! : प्रा. रुपेश पाटील. ; कोकण कला व शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ८५५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.

सावंतवाडी : संत कबीर यांनी आपल्या दोह्यांतून तत्कालीन परिस्थितीत दिलेला उपदेश आजही लागू पडतो. कबीरदासांचा प्रत्येक दोहा हा जीवनाचे तत्त्वज्ञान सांगत आहे. म्हणून प्रत्येकाने त्यांनी घालून दिलेली शिकवण जपणे, हिच त्यांना जयंतीनिमित्त खरी आदरांजली ठरेल, असे मत सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी व्यक्त केले.

कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी येथे ८५५ गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच संत कबीर जयंती साजरा करण्यात आली. यावेळी प्रा. पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, सामाजिक कार्यकर्ते बाळू देसाई, सावंतवाडी माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष वामन तर्फे, व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, कोकणसादचे संपादक संदीप देसाई, दैनिक प्रहारचे पत्रकार प्रवीण परब, दैनिक सकाळचे हेमंत खानोलकर, सिंधुदुर्ग प्रसारक मंडळाचे जयप्रकाश सावंत, पंचम खेमराजचे हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. देविदास बोर्डे आदि उपस्थित होते.

 

प्रा. रूपेश पाटील आपल्या व्याख्यानात पुढे म्हणाले ‘निंदक नियरे राखिए, ऑंगन कुटी छवाय ।, बिन पानी, साबुन बिना, निर्मल करे सुभाय ।।’ ह्या पंक्तीतून कबीरदास म्हणतात की जे तुमच्यावर टीका करतात त्यांना नेहमी सोबत ठेवावे. कारण ते लोक तुमचे दोष तुमच्यासमोर ठेवतात, ज्या सुधारून तुम्ही नेहमी प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल.
‘पोथी पढ़ि पढ़ि जग मुआ, पंडित भया न कोय ।
ढाई आखर प्रेम का, पढ़े सो पंडित होय ।।’ या ओळींतून कबीरदास या जगात कोणालाच खरे ज्ञान किंवा अंतिम सत्य केवळ पुस्तके वाचून मिळू शकत नाही, यासाठी फक्त प्रेमाची अडीच अक्षरे पुरेशी आहेत, असा आपणांस संदेश देतात.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल म्हणाले, “महाराष्ट्रातील वंचित मुलांना शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत गरजा पुरवून त्यांना चांगले जीवन प्राप्त करण्यास आम्ही सक्षम बनवू. विद्यार्थ्यांना कोणत्याही शैक्षणिक साहित्याची कमी भासू नये. त्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये. यासाठी कोकण संस्था सातत्याने कार्यरत आहे.” या उपक्रमांतर्गत शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले.


कोकण संस्थेच्या वतीने साक्षी पोटे, ऋचा पेडणेकर, गौरी आडेलकर, हर्षला अमूप, बिना अहिरे, सुरज कदम, प्रथमेश सावंत, अमित पाटील, वैष्णवी म्हाडगूत, अवंती गवस, सत्यवान भगत, चेतन धरणे, अमोल गुरम यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर शिर्के यांनी तर आभार प्रीती पांगे यांनी मानले.

 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles