पुणे : मावळ विधानसभेत भाजप गावोगावी फिरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करायची नाही, असा प्रचार करत आहेत. पण शरद पवारांनी उमेदवार उभा केला तर हे तुतारीचा प्रचार करण्याच्या तयारीत आहेत. असा गौप्यस्फोट अजित पवार गटाचे मावळमधील आमदार सुनील शेळके यांनी केला आहे. सुनील शेळकेंचा प्रचार न करण्याचा ठराव भाजपने आधीचं केला आहे. भाजपकडून इथं माजी आमदार बाळा भेगडेंनी आधीचं शड्डू ठोकलेले आहेत. अशातच शेळकेंनी हा दावा केल्यानं मावळ महायुतीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. पत्रकारांशी संवाद साधताना शेळकेंनी हा गौप्यस्फोट केला आहे.
काय म्हणालेत सुनील शेळके?
भाजप पक्षाची काही मंडळी गावागावात जाऊन सांगत आहे, आपण राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवारांना मदत करायची नाही, असं म्हणत आहेत. जे मागच्या दीड वर्षांपासून कधीही बोलले नाहीत. लोकसभा निवडणुकीला राष्ट्रवादी पक्ष महत्त्वाचा आहे, अजित पवारांचं काम चांगलं आहे, आमदारांचं काम चांगलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आपल्यासोबत आल्याने ताकद मिळणार आहे, आपण सर्वांनी महायुतीचा धर्म पाळून काम केलं पाहिजे. लोकसभा निवडणुकीला जे बोलत होते. ते आता गावागावात जाऊन सांगत आहेत, अजितदादाला मदत करायची नाही, हे ते आज बोलत आहेत, या वक्तव्यावर वास नक्की कुठेतरी आला आहे.
कार्यकर्त्यांना भाजपच्या पक्षाने भडकवून द्यायचं, त्यांना संभ्रमित करायचं. आपण पक्षाचे कसे निष्ठावंत आहोत, ते दाखवून द्यायचं, अजून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाचा उमेदवार उभा राहिला तर त्याला मदत झाली पाहिजे हा एक त्यांचा प्रयत्न असणार आहे, असं माझं मत आहे, असं सुनील शेळकेंनी म्हटलं आहे.