बुलढाणा : बुलढाण्यातील अवैध वाळू वाहतूकदारांचा भयंकर निष्काळजीपणा पाहायला मिळतोय. महामार्गावर रेती टाकून अवैध वाहतूक करणारा ट्रक फरार झाल्याची घटना समोर आली आहे. बुलढाण्यातील नांदुरा ते मोताळा महामार्गावरील वरुड फाट्याजवळ रात्री दहाच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने महामार्गावरच रेती टाकून पोबारा केला. मात्र महामार्गावर पसरलेल्या या रेतीवर घसरून दोन कारचा भीषण अपघात होऊन चार जण जखमी झाले आहेत.

रात्रीच्या सुमारास महामार्गावर रेती असल्याचं एका कारचालकाला न दिसल्याने त्याची कार 50 फूट नाल्यात कोसळून कार चालक जखमी झाला.

तर दुसरी कार याच मार्गावरून जात असताना रेतीवरून घसरून पुलाच्या कठड्याला धडकून भीषण अपघात झाला. यात तीन जण जखमी झाले. बुलढाण्यात अवैध वाळू वाहतूक करणारे शेकडो ट्रक आणि टिप्पर बिना नंबर प्लेट व धोकादायक आणी भरधाव वेगाने रेती वाहतूक करत असतात आणि यामुळे आता सर्वसामान्यांचे जीव धोक्यात आल्याचे चित्र आहे.



