सावंतवाडी : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायत वेत्ये येथे उद्या रविवार दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी ‘सेलिब्रिटी भेट कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात तरुणाईचे प्रेरणास्थान, सुप्रसिद्ध अभिनेते पृथ्वीक प्रताप तसेच कोकणची अष्टपैलू लोकप्रिय अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर उपस्थित राहून ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत.


सकाळी १०.३० वाजता मान्यवरांच्या आगमनाने कार्यक्रमास सुरुवात होणार असून दीपप्रज्वलन व अभियान गीताने उद्घाटन केले जाणार आहे. यानंतर मुख्यमंत्री समृद्ध अभियानांतर्गत झालेल्या कामांची माहिती व ग्रामपंचायतीच्या यशोगाथेचे सादरीकरण होईल. सकाळी ११.३० वाजता मान्यवरांचा मार्गदर्शनपर संवाद, दुपारी १२.०० वाजता कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.

या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथील मुख्य व उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांसह सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच गुणाजी गावडे भूषविणार आहेत.
हा कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालय, वेत्ये येथे आयोजित करण्यात आला असून सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी, अभियान समितीचे सदस्य व सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सरपंच गुणाजी गावडे, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान समिती अध्यक्ष, सदस्य व वेत्ये ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.



