सावंतवाडी : कोलगाव परिसरात झालेली विकास कामे ही अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचा गंभीर आरोप उमेदवार मायकल डिसोजा यांनी केला आहे. विकासाच्या नावाखाली केवळ मलिदा खाण्याचे काम समोरच्या उमेदवारांनी केल्याचा घणाघाती आरोप करत, आता जनता यांना मतपेटीतून योग्य उत्तर देणार असल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, केवळ आकड्यांचे दावे करून कोणाचा विजय होत नसतो. खरा निकाल नऊ तारखेला स्पष्ट होईल, असे सांगत त्यांनी विरोधकांच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “माझं व्हिजन हे पूर्णपणे विकासाभोवती केंद्रित आहे. मला कोणावरही वैयक्तिक आरोप करायचे नाहीत,” असे स्पष्ट करत मायकल डिसोजा यांनी आपली भूमिका मांडली.
कोलगावात आजही अनेक प्रलंबित मूलभूत प्रश्न आहेत. पाणी, रस्ते, वीज, युवकांचे प्रश्न यांसारख्या मुद्द्यांकडे आजपर्यंत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहे. “मी निवडून आल्यावर हे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी त्यांनी आणखी एक सवाल उपस्थित केला. “जर खरोखर विकास कामे केली असतील, तर मग पैसे वाटण्याची वेळ का येते..?” असा थेट प्रश्न उपस्थित करत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले. आजपर्यंत या मतदारसंघात हुकूमशाही, दादागिरी आणि मलिदा खाण्यापलीकडे काहीच झाले नाही, असा आरोप करत त्यांनी जनतेला परिवर्तनासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले. कोलगावात बदलाची लाट निर्माण होत असून, यावेळी मतदार विकासाला प्राधान्य देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



