✍️ रूपेश पाटील.
सावंतवाडी / सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आज सकाळी १० वाजता मतमोजणीला प्रारंभ होताच जिल्ह्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापणार आहे. ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची नसून, अनेक दिग्गजांसाठी ती मिनी विधानसभा आणि प्रतिष्ठेची लढाई ठरली आहे.
कोण मारणार बाजी?
कोणाच्या गळ्यात पडणार विजयाचा हार?
आणि कुणाला गिळंकृत करणार पराभवाची धूळ?
या साऱ्या प्रश्नांची उत्तरं काही तासांतच मिळणार आहेत. मात्र त्याआधीच उमेदवारांच्या छावणीत प्रचंड अस्वस्थता, धाकधूक आणि धडधड पाहायला मिळत आहे.
बंडखोरी महायुतीसाठी ठरणार डोकेदुखी?
या निवडणुकीतील सर्वात मोठा फॅक्टर ठरतोय तो म्हणजे बंडखोरी! सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक मतदारसंघांत महायुतीतील इच्छुकांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत थेट अधिकृत उमेदवारांना आव्हान दिले. पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रचारादरम्यान महायुतीला मतदान करण्याचे जाहीर आवाहन करत, ‘ऐकलं नाही तर गाठ माझ्याशी आहे’ असा सज्जड इशाराही दिला होता. मात्र स्थानिक गटबाजी, नाराजी आणि अहंकार यामुळे हा इशारा किती प्रभावी ठरला, याची खरी परीक्षा आज आहे.
तळवडे – कोलगाव : प्रतिष्ठेचा महासंग्राम!
जिल्ह्यातील सर्वात प्रतिष्ठेची आणि लक्षवेधी लढत तळवडे व कोलगाव मतदारसंघात पाहायला मिळत आहे.
तळवडे मतदारसंघात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे विश्वासू, भाजप युवा नेते संदीप गावडे मैदानात आहेत. मात्र त्यांच्यासमोर ठाकरे गटाचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ आणि अपक्ष उमेदवार अमेय पै यांचे दुहेरी आव्हान उभे आहे. ‘बाहेरचा उमेदवार’ म्हणून झालेली ट्रोलिंग, भाजपमधीलच ज्येष्ठ पदाधिकारी प्रमोद गावडे यांची नाराजी हे सगळे संदीप गावडेंना महागात पडणार का? की ‘विकासाचे व्हिजन’ आणि सुयोग्य नियोजनबद्द प्रचार सगळं चित्र बदलणार? याचं आज उत्तर मिळेल.
कोलगाव मतदारसंघात जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग यांच्यासमोर भाजपचे अपक्ष बंडखोर मायकल डिसोजा यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. येथे ‘अदृश्य शक्ती’ या शब्दाने गेल्या काही दिवसांत राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. ती शक्ती कोणाच्या बाजूने उभी आहे, याचा उलगडा आज होणार आहे. विकासकामांतून उभी केलेली महेश सारंग यांची प्रतिमा जनता मान्य करणार, की अपक्ष बंडखोर इतिहास घडवणार? याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
इतर मतदारसंघांतही धक्कादायक निकालांची शक्यता –
इतर मतदारसंघांतही चित्र तितकेच धुसर आहे. यात आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघात भाजप बंडखोर शर्वाणी गांवकर यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार सुदन उर्फ सुधा कवठणकर यांच्यासमोर जोरदार आव्हान उभं केलं आहे.
आंबोलीत जरी मैत्रीपूर्ण लढत असली, तरी सध्या भाजपच्या शोभा गुलाबराव गावडे यांचे पारडे जड मानले जात आहे. मात्र ठाकरे गटाच्या सुप्रिया दिनेश गावडे यांनी जर ‘धनुष्यबाणाचा अचूक नेम’ साधला, तर येथेही उलथापालथ अटळ आहे.
‘राणे’ हेच किंमेकर – आजपर्यंतचा इतिहास.
आजपर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेली विकास कामे जनतेसमोर असल्यामुळे येथील मतदारांनी आजपर्यंत ‘राणे’ या एका छत्रछायेखाली कौल दिलाय. अनेकदा जिल्हा परिषद एकतर्फी हाती घेत माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांनी इतिहास घडविला आहे. आता तर ते स्वतः खासदार, लहान सुपुत्र जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे व सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार व माजी मंत्री दीपक केसरकर हे सगळे एकत्र आहेत आणि खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली ‘महायुती’ म्हणून ही निवडणूक लढवली गेली आहे. मात्र असे असतानाही अनेक ठिकाणी महायुतीतीलच विशेषत: भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करत आव्हान उभे केले आहे. आता त्यांचे हे आव्हान कितपत तग धरते? हे देखील काही क्षणातच स्पष्ट होणार आहे. एक मात्र नक्की या निवडणुकीचा निकाल अनेकांचे ‘राजकीय भविष्य निकाली काढणार आहे’. त्यामुळे आजपर्यंतच्या इतिहासात सर्वात आगळीवेगळी निवडणूक यंदाची होत आहे.
निकाल काय सांगणार?
ही निवडणूक अनेकांसाठी भविष्याचा रस्ता ठरवणारी, तर काहींसाठी राजकीय अस्तित्वाचा अंतिम निकाल ठरणार आहे. आज मतमोजणी सुरू होताच सिंधुदुर्गच्या राजकारणात कोण उभा राहणार, कोण कोसळणार आणि कुणाची ताकद वाढणार? याचं चित्र स्पष्ट होईल. एक मात्र सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा आजचा निकाल महाराष्ट्राच्या राजकारणात दूरगामी संदेश देणार आहे!



