सावंतवाडी : वैश्यवाणी समाजाच्या एकजुटीला आणि प्रगतीच्या वाटचालीला नवी दिशा देणाऱ्या ‘हिंदू वैश्यवाणी युवा संघटना, सावंतवाडी’ या नव्या पर्वाचा शुभारंभ येत्या १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता गवळी तिठा येथील ‘वैश्यभवन’ येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. युवा शक्तीला संघटित करून त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या ध्येयाने प्रेरित हा सोहळा शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.
या ऐतिहासिक क्षणाचे उद्घाटन लोकप्रिय युवा सिनेअभिनेता अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच माजी आमदार राजन तेली, माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर, सिंधुदुर्ग जिल्हा वैश्यवाणी समाज अध्यक्ष सुनील भोगटे यांची विशेष उपस्थिती सोहळ्याची शोभा वाढवणार आहे.
यावेळी कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, सावंतवाडी तालुका वैश्यवाणी समाज अध्यक्ष रमेश बोंद्रे, महिला अध्यक्षा सौ. तनुजा पोकळे यांच्यासह समाजातील अनेक मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे.
– गौरवाचा सोहळा…सन्मानाची परंपरा!
या शुभारंभ सोहळ्यात समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा तसेच जिल्ह्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
युवकांसाठी नवे क्षितिज… रोजगाराच्या संधींची दारे खुली!
ही संघटना केवळ संघटनात्मक कार्यापुरती मर्यादित न राहता रोजगारनिर्मितीच्या दिशेनेही ठोस पावले उचलणार आहे. पत्रकार परिषदेत माहिती देताना कृतिका कोरगावकर यांनी सांगितले की, समाजातील कोणताही तरुण किंवा तरुणी रोजगारापासून वंचित राहू नये, हा संघटनेचा ध्यास असेल. महिला व युवतींसाठी ब्युटी पार्लर कोर्स, केक बनवण्याचे प्रशिक्षण, तसेच महाविद्यालयीन युवतींसाठी पार्ट-टाइम रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची योजना आहे.
पत्रकार परिषदेला प्रशांत वाळके, अरुण भिसे, सुनील मीशाळ, लक्ष्मण गवंडळकर, शंभू वीरनोडकर, अमित गवंडळकर, श्रेयस मुंज, कृतिका कोरगावकर, तनुजा पोकळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
“युवा शक्तीला एकत्र आणून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. सर्व समाजबांधवांनी सहकुटुंब उपस्थित राहून या ऐतिहासिक सोहळ्याला साक्षी राहावे,” असे आवाहन युवा कार्यकर्त्यांनी केले आहे.
सावंतवाडीच्या सामाजिक आणि युवा चळवळीच्या इतिहासात नवे पान लिहिणारा हा सोहळा निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.



