पुणे : पुणे जिल्ह्यातील इंदापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या मृत्यूमुळे विरह सहन न झाल्याने तिच्या मृत्यूच्या तिसऱ्याच दिवशी पतीने आपली जीवनयात्रा संपवली आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर नैराश्यात गेलेल्या पतीनेही आत्महत्या करत आयुष्याचा शेवट केला आहे. दोनच दिवसांपूर्वी पत्नीचा डेंग्यूने मृत्यू झाला होता.
स्वप्निल व श्रावणी यांचे दोन वर्षापूर्वी लग्न झाले होते व त्यांना ७ महिन्यांची एक मुलगी आहे. नियतीच्या या क्रूर खेळात या चिमुकलीच्या डोक्यावरील आई-वडिलांची छत्र हरपले आहे. तीन दिवसात पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने त्यांची ७ महिन्यांची चिमुकली पोरकी झाली आहे. स्वप्निल सुतार असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. त्याची पत्नी श्रावणी हिचा दोन दिवसापूर्वी डेंग्यूने मृत्यू झाला होता. पत्नीच्या अचानक मृत्यूने स्वप्निल नैराश्येत होता. या नैराश्येतूनच त्याने टोकाचं पाऊल उचललं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार स्वप्निलची पत्नी श्रावणीचा दोन दिवसाआधी डेंग्यूमुळे शुक्रवारी निधन झाले. तिच्या निधनानंतर स्वप्नील कुणाशीही बोलत नव्हता. त्याने जेवणही घेतले नव्हते. रविवारी दुपारी त्याने कुटूंबीयांना सांगितले की, मी थकलोय जरा आराम करतो. असे म्हणत घरातील खोलीत गेला. तो झोपला असेल म्हणून कोणीही त्याला उठवायला गेले नाही. बराच वेळ झाल्याने घरातील नातेवाईकांनी त्याला हाका मारल्या. मात्र आतून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले. आतील दृष्य पाहून त्यांना धक्का बसला.
स्वप्नीलने घराच्या छताच्या लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.