जन्मतः फाटलेले ओठ व टाळू यासाठी तुळस येथे मोफत शस्त्रक्रिया शिबीर.

वेंगुर्ला : ऑपरेशन स्माईल आणि वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग (तुळस) यांच्या संयुक्त विद्यमाने जन्मतः फाटलेले ओठ व टाळू (Cleft Lip & Palate) असलेल्या रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून अनेक बालकांना नवजीवन देण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न या माध्यमातून साकार होणार आहे.
या विशेष शस्त्रक्रिया शिबिराचा कालावधी दि. १३ मार्च ते २० मार्च २०२६ असा निश्चित करण्यात आला आहे. सर्व शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात येणार असून रुग्णांसाठी भोजन, वास्तव्य तसेच प्रवासाची व्यवस्था देखील विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे दुर्गम व ग्रामीण भागातील गरजू रुग्णांनाही या संधीचा लाभ सहजपणे घेता येणार आहे. शस्त्रक्रियेपूर्व तपासणी शिबीर दि. १ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता तुळस येथे आयोजित करण्यात आले आहे.

श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय (तुळस श्री देव जैतीराश्रित संस्था, मुंबई – बहुउद्देशीय सभागृह) येथे ही तपासणी होणार असून पात्र रुग्णांची निवड याच दिवशी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.
नोंदणीची अंतिम तारीख २८ फेब्रुवारी २०२६ अशी असून इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी डॉ. सचिन परूळकर (मो. ९४२१२३८०५३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.
जन्मतः फाटलेले ओठ व टाळू ही केवळ बाह्य शारीरिक समस्या नसून त्याचा परिणाम बालकांच्या आरोग्यावर, बोलण्याच्या क्षमतेवर, खाणे-पिणे यावर तसेच त्यांच्या आत्मविश्वासावरही होतो. योग्य वेळी शस्त्रक्रिया केल्यास मुलांचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते आणि ते आत्मविश्वासाने समाजात वावरू शकतात. त्यामुळे गरजू पालकांनी या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles