कुडाळ : तालुक्यातील माणगावमध्ये गेले काही दिवस पुन्हा एकदा बीएसएनएलच्या नेटवर्कचा लपंडाव सुरू झाला असून नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. कधी रेंज गायब, कधी कॉल ड्रॉप, तर कधी इंटरनेट पूर्णपणे ठप्प – या प्रकारामुळे संतापाची लाट उसळली आहे. वारंवार तक्रारी करूनही BSNL चे अधिकारी ढिम्म हालचाल करत नसल्याचा आरोप ग्रामस्थांतून होत आहे. “फोन लावला तर उचलत नाहीत, कार्यालयात गेलं तर ठोस उत्तर मिळत नाही. अधिकारी वर्ग मस्तवाल झाला आहे का?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
माणगावमधील बँका, हॉस्पिटल, ग्रामपंचायत, ई-सेवा केंद्रे आणि इतर अत्यावश्यक सेवा या मोठ्या प्रमाणावर BSNL नेटवर्कवर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत रेंज गायब होत असल्याने व्यवहार ठप्प होत आहेत, रुग्णांची गैरसोय होत आहे, शासकीय कामकाजात अडथळे निर्माण होत आहेत. डिजिटल इंडिया च्या गप्पा मारणाऱ्या यंत्रणेला माणगावमधील वास्तवाचे भान आहे का, असा सवाल आता विचारला जात आहे. यापूर्वीही याच प्रश्नावर पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांच्या नेतृत्वाखाली अनोखे आंदोलन छेडण्यात आले होते. त्यानंतरच BSNL ने 4G सेवा सुरू केली होती. मात्र काही दिवस सुरळीत सेवा दिल्यानंतर पुन्हा नेटवर्क गायब होऊ लागल्याने नागरिकांचा संयम सुटत आहे.
विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण देखील यामुळे विस्कळीत झाले आहे. परीक्षा काळात इंटरनेट नसल्याने विद्यार्थ्यांना मोठा मानसिक ताण सहन करावा लागत आहे. “नेटवर्क नसल्याने मुलांचे भविष्य धोक्यात येत आहे,” अशी पालकांची भावना आहे. अखेर या सर्व प्रकाराला कंटाळून पंचायत समिती सदस्य योगेश धुरी , माणगाव उपसरपंच बापू बागवे, एकनाथ धुरी , ग्रामपंचायत सदस्य काजल नाईक , तसेच शिवसेना शहरप्रमुख सचिन भिसे यांनी BSNL अधिकाऱ्यांची थेट भेट घेत निवेदन दिले.
“माणगावमध्ये तत्काळ रेंज पूर्ववत करा. अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याची सर्व जबाबदारी BSNL प्रशासनाची असेल,” असा थेट इशारा योगेश धुरी यांनी दिला.
आता BSNL प्रशासन जागे होणार का, की पुन्हा एकदा आंदोलनाच्या ठिणग्या पेटणार, याकडे संपूर्ण माणगावकरांचे लक्ष लागले आहे.



