सावंतवाडी : शेअर ट्रेडिंग मार्केट घोटाळ्याच्या प्रकरणाने अखेर मोठे वळण घेतले असून करोडपती सागर कारिवडेकरच्या सावंतवाडीतील आलिशान बंगल्याचा आज पंचनामा करण्यासाठी ठाणे क्राईम ब्रँचचे विशेष पथक आज सकाळी सावंतवाडीत दाखल झाले असून या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
गुंतवणूकदारांना मोठ्या नफ्याचे आमिष दाखवत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे. ठाण्यातील सचिन राणे, प्रिती राणे आणि सावंतवाडीतील सागर कारिवडेकर यांच्यातील कथित ‘ठाणे ते सावंतवाडी’ कनेक्शन उघड झाल्याने तपासाला गती मिळाली आहे. या तिघांना घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार मानले जात असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, घोटाळा उघडकीस येताच सागर कारिवडेकर फरार झाल्याची चर्चा असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आहे. सावंतवाडीत त्याने जर्मन टेक्नॉलॉजीवर आधारित आलिशान बंगला उभारला होता. याच बंगल्याचा आज नातेवाईकांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात येत असून संबंधित कागदपत्रे व मालमत्तेची तपासणी सुरू आहे.
या प्रकरणामुळे संतप्त झालेल्या ठाण्यातील गुंतवणूकदारांनी काल ठाणे पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर अवघ्या काही तासांत क्राईम ब्रँचचे पथक सावंतवाडीत दाखल झाल्याने तपासात मोठी हालचाल झाल्याचे दिसून येत आहे.
पुढील तपास सुरू असून या घोटाळ्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये अडकले असल्याने या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.



