सावंतवाडी : येथील उपवनसंरक्षक (डिएफओ किंवा डिसीएफ) यांच्या कार्यालयाच्या परिसरात झालेली वृक्षतोड ही खरंच एक आश्चर्याची बाब आहे. माननीय उच्च न्यायालयाने (२२ मार्च २०२५) दिलेल्या निर्देशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी दोडामार्ग या दोन तालुक्यातील इको सेन्सिटिव्ह गावांतील निसर्गाचे सक्षमतेने संरक्षण व्हावे, या उद्देशाने एक टास्क फोर्स समिती नेमण्यात आली आहे. सदर समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून जिल्हा उपवनसंरक्षक आणि जिल्हा पोलिस अधीक्षक हे महत्त्वाचे सदस्य आहेत. संपूर्ण दोडामार्ग तालुका आणि सावंतवाडी तालुक्यातील १३ गावांमध्ये वृक्षतोड बंदीचे कडक आदेश देखील माननीय उच्च न्यायालयाने दिलेले आहेत.
असे असताना टास्क फोर्स समितीतील एक सदस्य असलेल्या आणि ज्यांच्या वर जिल्ह्यातील वृक्ष,वने आणि वन्यजीव यांच्या संरक्षणाची मोलाची जबाबदारी आहे त्यांच्याच कार्यालय/निवास परिसरात विकासकामांसाठी अनेक वर्षे जपलेल्या मोठ्या वृक्षांची कत्तल होते हे आश्चर्यकारक तर आहेच पण संशयास्पद देखील आहे.
अशी कुठली विकासकामे आहेत ज्यासाठी मोठे वृक्ष जमिनदोस्त करण्यात आले?
विकासनिधी खर्च करण्यासाठी थातूरमातूर कारणं देऊन वृक्षांचा बळी देणे हे संरक्षकच भक्षक झालेले आहेत हे दर्शवते.
सरमळे कोलझरसारख्या इतर अनेक इको सेन्सिटिव्ह गावांमध्ये झालेली बेसुमार वृक्षतोड नक्की का आणि कशी काय झाली? याचे उत्तर उपवनसंरक्षक कार्यालय परिसरात झालेल्या वृक्षतोडीमध्ये दडलेले आहे का?, असा सवाल पर्यावरण प्रेमी तथा सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जयंत परुळेकर यांनी केला आहे.
डॉ. परुळेकर पुढे म्हणाले, “विकास” नावाचा आजार झालेल्या भस्मासुरांना निसर्ग संपूर्णपणे संपवल्याशिवाय शांती लाभणार नाही हेच खरं!, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.



