उपक्रमशील व कलाप्रेमी शिक्षक हंसराज गवळे यांचा गोवा राज्यात दिमाखदार आणि प्रेरणादायी सन्मान! ; कला, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा गौरव.

सावंतवाडी : तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात आपल्या बहुआयामी प्रतिभेचा ठसा उमटवणारे, इन्सुली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ५ येथील उपक्रमशील व कलाप्रेमी शिक्षक हंसराज व्यंकटराव गवळे यांचा विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गोवा राज्यातील वेरणा येथे अत्यंत दिमाखदार आणि प्रेरणादायी वातावरणात विशेष सन्मान करण्यात आला.

अखिल भारतीय एस.सी., एस.टी. कर्मचारी संघटना यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या भव्य संयुक्त जयंती सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारांची तेजस्वी परंपरा उजळून निघाली. या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी सोहळ्यात गवळे सरांचा सन्मान म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाला मिळालेली एक अर्थपूर्ण आणि गौरवशाली पावती ठरली.

या कार्यक्रमासाठी कोकण रेल्वेचे डी.ई. शुभम सिन्हा, प्रेरणादायी वक्ते प्रा. रुपेश पाटील, वरिष्ठ डी.ओ. इनायत हुसेन, संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रशांत जाधव, सचिव दीपक जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला एक वेगळीच उंची आणि वैचारिक समृद्धी प्राप्त झाली. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन विशाल जाधव यांनी केले.

हंसराज गवळे हे केवळ शिक्षक नसून एक सर्जनशील कलावंत, कुशल शिल्पकार आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. आपल्या कुंचल्यातून आणि हस्तकलेतून त्यांनी साकारलेली विविध शिल्पे व चित्रे ही त्यांच्या कलात्मकतेची साक्ष देतात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत असतात, तर सामाजिक जाणीव जपणाऱ्या कार्यातही ते नेहमीच अग्रेसर असतात.

 
त्यांच्या या उल्लेखनीय, प्रेरणादायी आणि समाजोपयोगी कार्याची दखल घेत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पावन पर्वावर त्यांना बहुमानित करण्यात आले, ही बाब संपूर्ण शिक्षण क्षेत्रासाठी अभिमानाची ठरली आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, शिक्षण सभापती प्रितेश राऊळ तसेच प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीनेही गवळे सरांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या या यशस्वी वाटचालीवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गवळे सरांचा हा सन्मान म्हणजे केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून, ग्रामीण भागातील शिक्षकांच्या कर्तृत्वाला मिळालेली उज्ज्वल दाद आहे. त्यांच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळत असून, त्यांच्या यशोगाथेने शिक्षण, कला आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम साकारला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles