सावंतवाडी : उबाठा शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख व माजी आमदार वैभव नाईक यांनी युवकांना संघटनेत सक्रिय संधी देत आगामी दोन वर्षांत शिवसेना अधिक सक्षम व मजबूत करण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. जिल्हाप्रमुख पदाची धुरा स्वीकारल्यानंतर प्रथमच सावंतवाडी येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाला दिलेल्या भेटीत त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना हा विश्वास व्यक्त केला.
यावेळी शिवसैनिकांनी जल्लोषपूर्ण वातावरणात त्यांचे भव्य स्वागत केले. घोषणाबाजी, ढोल-ताशांच्या गजरात कार्यालय परिसर दणाणून गेला होता. या स्वागतामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असल्याचे चित्र दिसून आले.
नाईक म्हणाले, “शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने मिळालेला हा कालखंड संघटन मजबूत करण्यासाठी महत्त्वाचा आहे. येत्या दोन वर्षांत प्रत्येक स्तरावर युवकांना संधी देत नवीन नेतृत्व घडवू. तसेच जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना एकत्र आणून आणि प्रवाहाबाहेर गेलेल्यांना पुन्हा संघटनेत सहभागी करून घेत शिवसेनेचा विस्तार करू.”
पुढे ते म्हणाले की, जिल्हाभर लवकरच विभागनिहाय बैठका घेऊन कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जातील आणि त्यावर तातडीने उपाययोजना केल्या जातील. शिवसैनिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत संघटना अधिक गतिमान केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, जिल्ह्यातील ‘हत्ती हटाव’ मोहिमेबाबत लवकरच व्यापक आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला.

या प्रसंगी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या हस्ते नाईक यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला चंद्रकांत कासार, राजू शेटकर, बाळा गावडे, रमेश गावकर, शैलेश गावंडळकर, सीमा मठकर, नम्रता झारापकर, श्रुतिका दळवी, शब्बीर मणियार, फिलीप्स रॉडिक्स, साई काणेकर, आबा केरकर, विनोद काजरेकर, प्रशांत बुगडे, निशिकांत तोरसकर, आशिष सुभेदार, प्रमोद सावंत, समीरा खलील, उदय अळवणी, गोकुळदास मोटे, वाडकर यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर नाईक यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करत संघटनवाढीच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. उपस्थित पदाधिकाऱ्यांनीही आपले विचार मांडत आगामी काळात एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.



