कासमध्ये शेतपाणंद रस्त्यांचा नवा अध्याय! ; तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडून सरपंच प्रवीण पंडित यांच्या कार्याचे कौतुक.

सावंतवाडी : “शेतकऱ्याच्या बांधापर्यंत विकास पोहोचला, तरच गाव समृद्ध होते,” याची प्रचिती कास गावात येत आहे. अनेक वर्षे वाद-विवाद, तंटे आणि अडथळ्यांमुळे बंद अवस्थेत असलेले शेतपाणंद रस्ते लोकसहभागातून खुले करून कास ग्रामपंचायतीने ग्रामीण विकासाचा आदर्श निर्माण केला आहे. या उपक्रमाची पाहणी करण्यासाठी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी कास गावाला भेट देत सरपंच प्रवीण पंडित यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.
राज्य शासनाच्या “मुख्यमंत्री शेतपाणंद रस्ते खुले करा” या अभियानाला तत्काळ प्रतिसाद देत सरपंच प्रवीण पंडित यांनी ग्रामपंचायत अधिकारी ठाकूर, ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या सहकार्याने गावातील तब्बल नऊ शेतपाणंद रस्ते पुन्हा सुरू केले. अनेक वर्षे अडथळ्यांत अडकलेले हे मार्ग आता शेतकऱ्यांसाठी नव्या आशेचे दार ठरत आहेत.
तहसीलदार श्रीधर पाटील यांनी पाहणीदरम्यान सांगितले की, “वाद न वाढवता संवादातून प्रश्न सोडवत एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्ते खुले करणे ही कौतुकास्पद बाब आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेले हे काम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरेल.”
शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत ट्रॅक्टर, यंत्रसामग्री आणि वाहने सहज पोहोचू लागल्याने शेतीमाल वाहतुकीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार आहे. भुईमूग, शेंगदाणे, चवळी, नाचणी यांसारख्या पिकांना योग्य बाजारपेठ आणि हमीभाव मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सरपंच प्रवीण पंडित यांनी सांगितले.
पंडितवाडी ते किनळेकरवाडी तसेच किनळेकरवाडी ते पार हद्दीपर्यंतचे शेतपाणंद रस्ते लोकसहभागातून पूर्ण करण्यात आले. काही रस्ते स्वखर्चातून तर काही ग्रामस्थांच्या श्रमदानातून साकारल्याने गावात विकासाबरोबर एकोप्याचे वातावरण निर्माण झाले आहे. “माझा शेतकरी बांधव खचला नाही पाहिजे,” या भावनेतूनच हे काम हाती घेतल्याचे प्रवीण पंडित यांनी नमूद केले.


या वेळी ग्राममहसूल अधिकारी सीमा कांबळे, कोतवाल विनोद धुरी, ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ पंडित यांच्यासह नारायण पंडित, अभिमान्यू कासकर, पांडुरंग पंडित, नामदेव पंडित, जयवंत पंडित, शशिकांत पंडित, शांताराम राणे, बाळकृष्ण पंडित, महादेव राणे, घनश्याम पंडित, काशीराम पंडित, अनिल किनळेकर, प्रविण शांताराम पंडित आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles