कलेच्या जतनासाठी गावपातळीवरील संस्था महत्त्वाच्या. : युवा व क्रीडा मंत्री डॉ. रमेश तवडकर.

कुठ्ठाळी (गोवा) : गावागावांत कला आणि संस्कृतीचे जतन व संवर्धन करणाऱ्या संस्था खऱ्या अर्थाने ग्रामीण कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देतात. अशा संस्थांमुळे गावातील एकोपा टिकून राहण्यास मदत होते, असे प्रतिपादन गोव्याचे कला, संस्कृती, युवा व क्रीडा मंत्री डॉ. रमेश तवडकर यांनी केले.

कुठ्ठाळी येथील जगन्नाथ शेट कला संस्थेच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच कला व संस्कृती संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संगीत मराठी नाट्य महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शनिवारी सायंकाळी आयोजित या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ व कला रसिक उपस्थित होते.

यावेळी व्यासपीठावर उद्घाटक म्हणून Anton Vaz, गोवा सहकार भारतीयचे उपाध्यक्ष किसन फडते, कुठ्ठाळीच्या सरपंच सौ. उज्ज्वला राजेश नाईक, राज्य सांस्कृतिक पुरस्कार विजेते मास्तर पुंडलिक कळंगुटकर, संस्थेचे अध्यक्ष प्रा. सुनील शेट, उपाध्यक्ष रत्नाकर शेट आदी मान्यवर उपस्थित होते.

मंत्री डॉ. तवडकर म्हणाले, “आपला पिंड हा राजकारणाचा नसून समाजकारणाचा आहे. अत्यंत गरिबीतून शिक्षण घेत पुढे आलो. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रयत्न केले. आमोणे-खोतिगावसारख्या अविकसित भागात आदर्श युवा संघाची स्थापना केली. तसेच ‘लोकोत्सवा’सारख्या उपक्रमांतून गोव्याची खरी संस्कृती जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला.”

उद्घाटक आमदार Anton Vaz यांनी संस्थेच्या सातत्यपूर्ण कार्याचे कौतुक करताना, “कला-संस्कृती जपण्याचे काम ही संस्था निष्ठेने करत आहे. त्यामुळे गावातील कलाकारांना प्रेरणा मिळत असून, अशा उपक्रमांना आपण नेहमीच सहकार्य करू,” असे सांगितले.

किसन फडते यांनीही संस्थेच्या कार्याची प्रशंसा करून गावातील एकोपा टिकवण्यासाठी सर्वांनी अशा सांस्कृतिक उपक्रमांना पाठबळ द्यावे, असे आवाहन केले. राज्य सांस्कृतिक पुरस्कार विजेते मास्तर पुंडलिक कळंगुटकर यांचेही समयोचित मार्गदर्शन झाले.

यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये वासुदेव गंगाधर वेर्णेकर, राजेंद्र नरसिंह फडते, देवेंद्र शंकर केंकरे, आनंद लाडू नाईक, अवधूत ऊर्फ सूरज सखाराम कळंगुटकर, दिनेश सुदाम नाईक, समीर शशिकांत शिरोडकर, शिवराम विष्णू नाईक, दिलीप अनंत नाईक, संदीप सदाशिव नाईक, सुदेश बाबली गांवकर, संजय अनंत नाईक, योगेश विनायक नाईक, बाबलो मंगेश नाईक, विनय दिगंबर नाईक, धीरज सुरेश नाईक, गौरीश राया बोरकर, कृष्णा तुळशीदास नाईक, ज्ञानेश्वर तुळशीदास नाईक, नितीन विनायक नाईक, कल्पेश सुभाष नाईक, रत्नाकर जगन्नाथ शेट, श्रीकांत जगन्नाथ शेट, अनील जगन्नाथ शेट, सौ. सुनयना सुनील शेट यांचा समावेश होता. तसेच मरणोत्तर कै. राजेंद्र मंगलदास नाईक यांच्या सन्मानचिन्हाचा स्वीकार पुत्र रोनीत नाईक यांनी केला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कै. जगन्नाथ शेट यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष प्रा. सुनील शेट यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुनयना शेट यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. सुनील शेट यांनी केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles