आज भारतातील शिक्षण व्यवस्था एका भयानक वळणावर उभी आहे. वरवर पाहिलं तर सगळं झगमगाट दिसतो. स्मार्ट क्लासरूम, डिजिटल शिक्षण, नवीन शैक्षणिक धोरण, आधुनिक अभ्यासक्रम, कोचिंग क्लासचे भव्य बोर्ड, टॉपर विद्यार्थ्यांचे फोटो, शंभर टक्के निकालाच्या जाहिराती! पण या चमकदार पडद्यामागे एक काळोख दडलेला आहे. हा काळोख आहे विद्यार्थ्यांच्या उद्ध्वस्त होत चाललेल्या बालपणाचा, पालकांच्या आर्थिक लुटीचा आणि शिक्षण नावाच्या पवित्र क्षेत्राच्या निर्लज्ज बाजारपेठेत झालेल्या रूपांतराचा.
आज शिक्षण ज्ञानासाठी नाही, तर पैशासाठी चालवलं जात आहे. शाळा, कॉलेज, क्लासेस, परीक्षा संस्था, प्रकाशक, ऑनलाइन प्लॅटफॉर्म… प्रत्येकजण विद्यार्थ्यांना ग्राहक समजून व्यवसाय करत आहे. आणि या सगळ्यात विद्यार्थ्याचं आयुष्य, त्याचं मानसिक आरोग्य आणि त्याची स्वप्नं अक्षरशः चिरडली जात आहेत.
सर्वात संतापजनक प्रकार म्हणजे NEET, JEE आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी! लाखो विद्यार्थी दिवस-रात्र अभ्यास करून स्वतःला झिजवत असतात. अनेक गरीब पालक शेत विकतात, कर्ज काढतात, आईचे दागिने गहाण ठेवतात; फक्त मुलगा डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावा म्हणून. पण दुसऱ्या बाजूला काही दलाल, भ्रष्ट अधिकारी आणि शिक्षण माफिया लाखो-कोटी रुपये घेऊन पेपर आधीच विकतात! मग प्रामाणिक विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा तरी कशासाठी?
पेपर फुटतो म्हणजे फक्त प्रश्नपत्रिका बाहेर येत नाही; विद्यार्थ्यांचा विश्वास तुटतो. मेहनतीची किंमत संपते. “अभ्यास करून काही फायदा नाही, पैसे दिले की सगळं मिळतं” हा विषारी संदेश समाजात पसरतो. ही देशासाठी अत्यंत धोकादायक बाब आहे. कारण ज्या देशात मेहनतीपेक्षा भ्रष्टाचार मोठा होतो, त्या देशाचं भविष्य कधीच उज्ज्वल होऊ शकत नाही.
आज परिस्थिती इतकी बिघडली आहे की, विद्यार्थ्यांना अभ्यासापेक्षा व्यवस्थेची भीती वाटते. “पेपर पुन्हा होणार का?”, “गुणांमध्ये घोटाळा होणार का?”, “सीट पैशाने विकल्या जाणार का?” अशा प्रश्नांनी विद्यार्थ्यांची मानसिक अवस्था ढासळत आहे. आणि सरकार? प्रत्येक वेळी चौकशी समिती, निवेदनं, कारवाईच्या घोषणा! पण काही महिन्यांनी पुन्हा तोच प्रकार. याचा अर्थ स्पष्ट आहे – शिक्षण व्यवस्थेच्या मुळातच भ्रष्टाचाराची कीड लागली आहे.
या सगळ्यात कोचिंग क्लासवाल्यांनी तर शिक्षणाचं अक्षरशः दुकान उघडलं आहे. आज गावागावात, शहराशहरात कोचिंग क्लासचे भलेमोठे बोर्ड दिसतात. “आमच्याकडून AIR Rank”, “आमच्याकडून टॉपर”, “आमच्याकडून मेडिकल सिलेक्शन”! जणू विद्यार्थी नसून उत्पादन तयार केलं जात आहे. शिक्षणाचा आत्माच हरवून गेला आहे.
पूर्वी शाळा हे ज्ञानाचं केंद्र होतं. शिक्षक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देत होते. आज मात्र परिस्थिती उलटी झाली आहे. शाळा दुय्यम ठरत आहेत आणि क्लासेस मुख्य बनले आहेत. अनेक विद्यार्थी शाळेत फक्त हजेरी लावतात; खरं शिक्षण क्लासमध्ये घेतात. ही शिक्षण व्यवस्थेची सर्वात मोठी शोकांतिका आहे.
काही क्लासवाल्यांनी तर पालकांच्या भीतीचाच व्यवसाय केला आहे. “आमच्या क्लासशिवाय मेडिकल नाही”, “आमच्या नोट्सशिवाय IIT नाही”, “लवकर अॅडमिशन घ्या नाहीतर संधी जाईल” अशा जाहिराती करून पालकांना मानसिकदृष्ट्या जखडून टाकलं जातं. गरीब पालक लाखो रुपये फी भरतात. अनेक जण कर्जबाजारी होतात. पण त्या क्लासवाल्यांना विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी काही देणंघेणं नसतं; त्यांना फक्त व्यवसाय वाढवायचा असतो.
आज अनेक विद्यार्थी सकाळी पाच वाजता उठतात. शाळा, क्लास, टेस्ट, ऑनलाइन लेक्चर, होमवर्क, असाइनमेंट… दिवस संपतो; पण मुलाचं बालपण संपलेलं असतं. खेळ नाही, मैत्री नाही, कुटुंबाशी संवाद नाही. फक्त स्पर्धा! आणि ही स्पर्धा इतकी क्रूर झाली आहे की, अपयश आलं की विद्यार्थी नैराश्यात जात आहेत. आत्महत्या करत आहेत. एका परीक्षेच्या निकालाने जर एखादं मूल आयुष्य संपवत असेल, तर ती चूक त्या मुलाची नाही; त्या अमानुष व्यवस्थेची आहे.
आज शिक्षण क्षेत्रात “टॉपर” ही एक ब्रँड बनली आहे. क्लासवाले विद्यार्थ्यांच्या फोटोचा जाहिरातीसाठी वापर करतात. निकाल लागला की विद्यार्थ्यांचे कटआउट लावले जातात. पण अपयशी विद्यार्थ्यांचं काय? त्यांच्या डोळ्यातील अश्रू कुणाला दिसत नाहीत. कारण या बाजारात फक्त यश विकलं जातं; अपयश लपवलं जातं.
सरकारने शिक्षण क्षेत्रात इतके प्रयोग केले की, विद्यार्थ्यांनाच समजेनासं झालं की नेमकं काय शिकायचं. दरवर्षी अभ्यासक्रम बदल, परीक्षा पद्धती बदल, नवीन धोरणं, नवीन नियम! पण ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षक नाहीत, प्रयोगशाळा नाहीत, इंटरनेट नाही, पिण्याचं पाणी नाही. शहरात स्मार्ट क्लास आणि गावात गळकं छप्पर — ही कसली समान शिक्षण व्यवस्था?
आज शिक्षकांची अवस्थाही अत्यंत बिकट झाली आहे. शिक्षक ज्ञान देण्यापेक्षा ऑनलाइन माहिती भरण्यात, पोर्टल अपडेट करण्यात, अहवाल तयार करण्यात अडकून पडले आहेत. त्यांना विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवायला वेळच उरलेला नाही. शिक्षक हा समाजाचा शिल्पकार असतो; पण आज त्यालाच नोकरशाहीच्या ओझ्याखाली दाबलं जात आहे.
मोबाईल आणि सोशल मीडियानेही शिक्षणाचं मोठं नुकसान केलं आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली मुलं स्क्रीनमध्ये अडकली. माहिती वाढली; पण विचारशक्ती कमी झाली. पुस्तकं वाचण्याची सवय संपली. दोन मिनिटांच्या रील्स पाहणारी पिढी दोन पानांचा लेख वाचायला कंटाळते. ही परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे.
पालकांचाही यात मोठा वाटा आहे. अनेक पालक मुलांना समजून घेण्यापेक्षा त्यांच्यावर स्वतःची अपूर्ण स्वप्नं लादत आहेत. “शेजाऱ्याचा मुलगा डॉक्टर झाला, तूही हो”, “इतके मार्क आलेच पाहिजेत”, “अपयश परवडणार नाही” अशा दबावाखाली मुलं जगत आहेत. प्रत्येक मूल वेगळं असतं हेच आपण विसरत चाललो आहोत.
कोणाच्यातरी हातात कला असते, कोणाच्यातरी मनात विज्ञान असतं, कोणीतरी उत्तम लेखक होऊ शकतो, कोणीतरी उत्तम शेतकरी, उद्योजक किंवा कलाकार. पण आपण प्रत्येक मुलाला फक्त डॉक्टर आणि इंजिनियर बनवण्याच्या मागे लागलो आहोत. त्यामुळे हजारो मुलं स्वतःची खरी क्षमता गमावत आहेत.
आज शिक्षण क्षेत्रात प्रामाणिकपणाची किंमत उरलेली नाही असं चित्र तयार होत आहे. पेपरफुटी करणारे करोडपती होतात आणि प्रामाणिक विद्यार्थी नैराश्यात जातात. ही परिस्थिती देशासाठी अत्यंत लज्जास्पद आहे. कारण शिक्षण जर भ्रष्ट झालं तर समाजाचा पाया कोसळतो.
सरकारने आता कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. पेपरफुटी करणाऱ्यांना फक्त अटक करून उपयोग नाही; त्यांना अशी कठोर शिक्षा झाली पाहिजे की पुन्हा कोणी शिक्षणाशी खेळण्याची हिंमत करणार नाही. कोचिंग क्लासेसवर कठोर नियंत्रण आणलं पाहिजे. फीवर मर्यादा असली पाहिजे. जाहिरातींवर नियम असले पाहिजेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे — शाळांना पुन्हा सक्षम केलं पाहिजे.
शिक्षण हे व्यवसाय नाही; ते समाज घडवण्याचं माध्यम आहे. डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी तयार करणं हे शिक्षणाचं अंतिम ध्येय नाही. संवेदनशील, विचारशील आणि प्रामाणिक माणूस घडवणं हे शिक्षणाचं खरं उद्दिष्ट आहे. पण आज आपण माणूस घडवणं विसरलो आहोत आणि फक्त मार्कशीट तयार करत आहोत.
आज गरज आहे ती शिक्षण व्यवस्थेला आरसा दाखवण्याची. पालकांनी जागं व्हायला हवं. शिक्षकांनी आवाज उठवायला हवा. विद्यार्थ्यांनी स्वतःची किंमत गुणांपेक्षा मोठी समजायला हवी. आणि सरकारने शिक्षण क्षेत्रातील माफियांवर कठोर कारवाई केली पाहिजे.
कारण आज जर आपण गप्प बसलो, तर उद्या शिक्षण पूर्णपणे बाजाराच्या ताब्यात जाईल. त्या दिवशी गरीब विद्यार्थ्यांची स्वप्नं कायमची मरतील. प्रामाणिकपणा हरेल. आणि देशाचं भविष्य भ्रष्टाचाराच्या दलदलीत कायमचं अडकून पडेल.
शिक्षण मंदिर असतं, बाजार नाही!
विद्यार्थी माणूस असतो, ग्राहक नाही!
आणि शिक्षक राष्ट्र घडवतो, व्यवसाय नाही!
ही गोष्ट सरकारने, पालकांनी आणि समाजाने जितक्या लवकर समजून घेतली, तितकंच या देशाचं भविष्य वाचण्याची शक्यता उरेल.
- शमशुद्दीन नसिरुद्दीन आत्तार
शिरगाव, ता. देवगड जि. सिंधुदुर्ग.



