भ्रष्टाचारमुक्त, ड्रग्जमुक्त आणि गुन्हेगारीमुक्त महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री फडणवीस दिवस-रात्र कार्यरत! : मंत्री नितेश राणे. ; वैभव नाईक यांनी मुख्यमंत्र्यांवर बिनबुडाचे आरोप करू नयेत; पोलीस अधीक्षकांवरील आरोपांची माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार!

कणकवली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भ्रष्टाचारमुक्त, ड्रग्जमुक्त, गांजामुक्त आणि गुन्हेगारीमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी दिवस-रात्र कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याला गालबोट लावण्याची हिंमत माजी आमदार वैभव नाईक यांनी करू नये, असा सज्जड इशारा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला.

माध्यमांशी संवाद साधताना राणे म्हणाले की, माजी आमदार वैभव नाईक यांनी आमदार निलेश राणे यांच्या पत्रकार परिषदेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोणत्याही गुन्हेगाराला कधीही पाठबळ दिलेले नाही किंवा त्यांना संरक्षण दिलेले नाही. राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी कठोर भूमिका घेतली असून गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले आहेत.

“आज महाराष्ट्रात कोणताही गुन्हेगार गुन्हा करण्यापूर्वी विचार करतो, कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि गुन्हा केल्यानंतर सुटका होणार नाही, याची त्याला जाणीव असते. त्यामुळे महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती देशात आदर्श मानली जाते,” असेही राणे यांनी सांगितले.

पोलीस विभागातील काही अधिकारी चुकीचे काम करत असतील, तर त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांचे बारकाईने लक्ष असते. गृह खात्यातील भ्रष्ट अथवा निष्क्रिय अधिकाऱ्यांवर त्यांनी कठोर कारवाई करत त्यांना निलंबित केलेली अनेक उदाहरणे आहेत. आम्ही आमदार आणि मंत्री म्हणून अशा कारवाया प्रत्यक्ष पाहिल्या व अनुभवल्या असल्याचे राणे म्हणाले.

यावेळी त्यांनी आमदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांवर केलेल्या आरोपांचा उल्लेख करत, या संदर्भातील सर्व माहिती सरकारमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचविण्यात येईल, असे स्पष्ट केले. “कुठेही चूक आढळल्यास सरकार म्हणून आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाही. दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल, ही आमची ठाम भूमिका आहे,” असेही पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles