सावंतवाडी : भारतीय इतिहासातील कर्तृत्ववान, लोकाभिमुख आणि दूरदृष्टी असलेल्या राज्यकर्त्यांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे. न्यायप्रिय प्रशासन, समाजकल्याणाची तळमळ आणि स्त्रीशक्तीचे अद्वितीय उदाहरण म्हणून त्यांचे कार्य आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांची संस्कृती जोपासणे आणि त्यांचा आदर्श पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे हे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राज्य युवा नेते विशाल परब यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त सावंतवाडी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विशाल परब बोलत होते.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, तत्कालीन अत्यंत प्रतिकूल सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत अहिल्यादेवींनी दाखविलेल्या धैर्य, संयम आणि नेतृत्वगुणांची आजही समाजाला गरज आहे. प्रजेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांनी राज्यकारभाराचा आदर्श नमुना देशासमोर ठेवला. देशभरातील अनेक मंदिरे, घाट, धर्मशाळा आणि सार्वजनिक सुविधा उभारून त्यांनी लोकसेवेचा एक वेगळाच आदर्श निर्माण केला.
“अहिल्यादेवी होळकर या केवळ एक कुशल राज्यकर्त्या नव्हत्या, तर त्या समाजसुधारक, दूरदृष्टीच्या नेत्या आणि जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणाऱ्या मातृवत शासक होत्या. त्यांचे विचार आजच्या युवा पिढीला राष्ट्रनिर्माणासाठी प्रेरणा देणारे आहेत. त्यांच्या जीवनातून सेवाभाव, प्रामाणिकपणा, न्यायनिष्ठा आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी यांचे मौल्यवान धडे मिळतात,” असेही परब यांनी नमूद केले.
कार्यक्रमात उपस्थितांनी अहिल्यादेवींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा समाजात रुजविण्याचा संकल्प करण्यात आला.
या प्रसंगी भाजपा राज्य युवा नेते विशाल परब, विकास परब, सोशल मीडिया प्रमुख केतन आजगांवकर, सावंतवाडी शहर चिटणीस धिरेंद्र म्हापसेकर, श्रीकांत राजाध्यक्ष, साईप्रसाद भोई, साई नाईक, योगेश पेंडसे तसेच भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे वातावरण अहिल्यादेवींच्या कार्याच्या स्मरणाने आणि त्यांच्या प्रेरणादायी विचारांच्या उजाळ्याने भारावून गेले होते.



