सावंतवाडी : तालुक्यातील एका गावातील २७ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल ७ ते ८ वर्षे प्रेमसंबंध व शारीरिक संबंध ठेवत तिची फसवणूक केल्याप्रकरणी एका ३१ वर्षीय युवकाविरुद्ध सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी युवकाने पीडित तरुणीशी विवाह करण्याचे आश्वासन देत तिचा विश्वास संपादन केला. या आश्वासनाच्या आधारे दीर्घकाळ तिच्याशी प्रेमसंबंध तसेच शारीरिक संबंध ठेवले. मात्र, विवाहाचा निर्णय घेण्याची वेळ आल्यानंतर युवकाने लग्नास स्पष्ट नकार दिल्याने तरुणीची फसवणूक झाल्याचे समोर आले.
याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार सावंतवाडी पोलिस ठाण्यात सोमवारी (१ जून) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी युवकाला ताब्यात घेतले आहे.
लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक व अत्याचार केल्याच्या या गंभीर प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपासात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.



