सावंतवाडी : येथील मिलाग्रीस हायस्कूलमध्ये हिंदवी स्वराज्याचे शूर योद्धे आणि पराक्रमाचे प्रतीक असलेल्या महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालढाणा यांनी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर प्रशालेची विद्यार्थिनी कुमारी शमिका सावळ हिने महाराणा प्रताप यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रभावी भाषण सादर केले. तिच्या भाषणातून महाराणा प्रताप यांचे शौर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेम यांचा गौरवपूर्ण आढावा घेण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक फादर सालढाणा यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात महाराणा प्रताप यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकला. स्वाभिमान, जिद्द आणि मातृभूमीप्रती असलेली निष्ठा यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अंगीकारावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ. संध्या मुणगेकर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षिका शारदा गावडे यांनी केले.
महाराणा प्रताप यांच्या कार्याचा आदर्श विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


