दोडामार्ग: तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केर गावावर आज दुःखाची छाया पसरली आहे. गावातील ज्येष्ठ व सर्वांच्या आदरास पात्र असलेल्या सौ. रत्नप्रभा फटिराव देसाई (वय ८१) यांचे शुक्रवार सायंकाळी दुःखद निधन झाले.
त्यांच्या निधनाने देसाई कुटुंबीयांवर तसेच केर गावावर शोककळा पसरली आहे. प्रेमळ स्वभाव, कुटुंबवत्सल वृत्ती आणि समाजाशी असलेली जिव्हाळ्याची नाळ यामुळे त्या सर्वांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण करून होत्या. त्यांच्या जाण्याने एक मायाळू, कर्तृत्ववान आणि संस्कारांची शिदोरी देणारे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
त्या शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख तथा केर गावचे माजी सरपंच प्रेमानंद देसाई तसेच पशुसंवर्धन विभाग, वेंगुर्ला येथील सहाय्यक आयुक्त डॉ. विद्यानंद देसाई यांच्या मातोश्री होत.
आईचे छत्र हरपणे ही आयुष्यातील सर्वात मोठी पोकळी असते. देसाई कुटुंबीयांच्या या अपूरणीय दुःखात संपूर्ण केर ग्रामस्थ व परिसरातील नागरिक सहभागी झाले आहेत.



