‘सातासमुद्रापार गेला… पण शाळेला नाही विसरला!’ ; अमेरिकास्थित माजी विद्यार्थी सागर निगुडकर यांच्याकडून ८४ विद्यार्थ्यांना छत्र्या व खाऊचे वाटप. ; ‘ज्या शाळेने घडवलं, त्या शाळेचं ऋण फेडण्याचा प्रयत्न.’ ; विद्यार्थ्यांना दिला शिक्षणाचा प्रेरणादायी संदेश.

✍️ प्रशांत मोरजकर

सावंतवाडी : आपल्या मातृशाळेप्रती असलेली कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकी जपत अमेरिकेत वास्तव्यास असलेले माजी विद्यार्थी सागर निगुडकर यांनी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा निगुडे क्र. १, २ तसेच तीनही अंगणवाड्यांतील विद्यार्थ्यांना छत्र्या आणि खाऊचे वाटप करून प्रेरणादायी उपक्रम राबविला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे एकूण ८४ विद्यार्थ्यांना छत्र्यांचा लाभ झाला.

यावेळी पंचायत समिती सदस्य सदाशिव राणे, निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर, माजी सरपंच समीर गावडे, माजी उपसरपंच गुरुदास गवंडे, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा निधी गावडे, सदस्य संजना केसरकर, संतोष राणे, उद्योजक नारायण राणे, शाळेचे मुख्याध्यापक नारायण नाईक, शिक्षक कांदे, शिक्षिका देसाई, माजी विद्यार्थी गंधाली निगुडकर, पल्लवी निगुडकर तसेच ग्रामस्थ, पालक आणि शिक्षकवृंद उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सागर निगुडकर म्हणाले, “आज मी अमेरिकेत असलो, तरी माझी खरी ओळख या शाळेनेच घडवली आहे. अंगणवाडीपासून सातवीपर्यंतचे माझे बालपण याच गावात आणि याच शाळेत गेले. त्यामुळे या शाळेचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतून हा छोटासा उपक्रम केला आहे. भविष्यातही शक्य तेवढे योगदान देत राहीन. तुम्ही मनापासून शिका, मोठे व्हा आणि आपल्या गावाचे व शाळेचे नाव उज्ज्वल करा.”
माजी सरपंच समीर गावडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले, “पूर्वी आई-वडील ‘सातासमुद्रापार जा’ असे स्वप्न दाखवायचे. आज आपल्या गावातीलच एक विद्यार्थी अमेरिकेत पोहोचला; मात्र इतक्या मोठ्या यशानंतरही त्याने आपल्या शाळेला विसरले नाही. ही बाब प्रत्येकासाठी प्रेरणादायी असून सागर निगुडकर यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.”
प्रमुख पाहुणे पंचायत समिती सदस्य सदाशिव राणे यांनी विद्यार्थ्यांना नियमित शाळेत उपस्थित राहून मनापासून शिक्षण घेण्याचे आवाहन केले. तसेच पावसाळ्यात विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे शाळेत ये-जा करता यावी, यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. शाळेच्या भेटीदरम्यान त्यांनी नादुरुस्त वर्गखोल्यांची पाहणी करून पंचायत समिती स्तरावर शाळेसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
या उपक्रमातून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्र. १ व २ तसेच तीनही अंगणवाड्यांतील एकूण ८४ विद्यार्थ्यांना छत्र्या व खाऊचे वाटप करण्यात आले. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मातृशाळेबद्दल जपलेली आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित करणारा हा उपक्रम ठरला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री. सावंत यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक आणि ग्रामस्थांनी सागर निगुडकर यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे मनापासून कौतुक करत त्यांचे आभार मानले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles