निसर्गाचा घाला, पण जीव वाचला!, पहाटे घरावर माड कोसळून सावित्री सावंत यांचे मोठे नुकसान! ; गावकऱ्यांची माणुसकी धावून आली.

सावंतवाडी:  गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे असनिये-गावठण येथे सोमवारी पहाटे एक दुर्घटना घडली. येथील स्थानिक रहिवासी सावित्री साबाजी सावंत यांच्या राहत्या घरावर पहाटेच्या सुमारास अचानक माड कोसळून घराचे मोठे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे नेहमीप्रमाणे मुसळधार पाऊस आणि वेगवान वारा सुरू होता. यादरम्यान सावित्री सावंत या आपल्या घरात झोपल्या होत्या. पहाटेच्या वेळी अचानक एक मोठा आवाज झाल्याने त्या घाबरून जाग्या झाल्या. त्यांनी घराबाहेर आणि परिसरात पाहिले असता, त्यांच्या घराच्या छपरावर माड कोसळल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या अपघातात घराच्या छपराचे आणि भिंतीचे नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने सावित्री सावंत यांच्या घराकडे धाव घेतली. गावकऱ्यांनी एकजुटीने आणि तत्परतेने काम करत घरावरील कोसळलेला माड बाजूला केला. तसेच, पाऊस सुरू असल्याने घरात पाणी शिरू नये म्हणून तात्पुरती सोय म्हणून छपरावर प्लास्टिक अंथरून दिले. ग्रामस्थांच्या या समयसुचकतेमुळे आणि मदतीमुळे सावंत यांना मोठा दिलासा मिळाला. पहाटेच्या वेळी ही दुर्घटना घडली असली, तरी सावित्री सावंत या सुखरूप असून केवळ घराचे आर्थिक नुकसान झाले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles