ज्या शाळेने घडवलं आयुष्य, त्या शाळेचं ऋण फेडण्याचा माजी विद्यार्थ्यांचा हृदयस्पर्शी उपक्रम! ; इन्सुली नं. ४ शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना छत्री वाटप.

सावंतवाडी : “आपण ज्या शाळेत शिकलो, घडलो आणि आयुष्याची दिशा मिळाली, त्या शाळेचे ऋण कधीही फेडता येत नाही; मात्र कृतज्ञतेची भावना कृतीतून व्यक्त करता येते,” याच विचारातून इन्सुली येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा क्रमांक ४ च्या १९९९-२००० या वर्षातील सातवीच्या माजी विद्यार्थ्यांनी एक प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे. त्यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत छत्र्यांचे वाटप करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना छत्र्यांची भेट मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. माजी विद्यार्थ्यांच्या या प्रेमळ भेटीमुळे शाळेचे वातावरणही भावूक झाले.

दरवर्षी शाळेसाठी मदतीचा हात – 

१९९९-२००० बॅचचे माजी विद्यार्थी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने शाळेसाठी विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवत आहेत. दरवर्षी विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य मोफत उपलब्ध करून देत आपल्या शाळेप्रती असलेली कृतज्ञता ते कृतीतून जपत आहेत. आपल्या यशामध्ये शाळेचा आणि शिक्षकांचा मोठा वाटा असल्याची भावना व्यक्त करत हा उपक्रम भविष्यातही सुरू ठेवण्याचा त्यांचा निर्धार आहे.

पुन्हा जागल्या शालेय आठवणी – 

या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी नवज्योत गावडे, वासुदेव गावडे, सुधीर गावडे, निलेश परब, रसिका मुळीक, सुकांती सावंत आणि सीमा पार्सेकर उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. शिक्षकांनी दिलेले संस्कार आणि मार्गदर्शन यामुळेच आज आपण आयुष्यात यशस्वी झालो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

मुख्याध्यापकांचे कौतुक –

यावेळी मुख्याध्यापक रुपेश परब म्हणाले, “आपण ज्या शाळेत शिक्षण घेतले, त्या शाळेच्या प्रगतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढे येणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. १९९९-२००० बॅचचा हा उपक्रम इतर माजी विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरेल.”

शिक्षकांनी मानले आभार –

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका श्रीमती करमळकर यांनी केले. शेवटी मुख्याध्यापक श्री. रुपेश परब यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानत त्यांच्या शाळेप्रती असलेल्या जिव्हाळ्याचे आणि सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.

इन्सुली परिसरात या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, “शाळेचे ऋण कृतज्ञतेने फेडणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा आदर्श” म्हणून या उपक्रमाची चर्चा सुरू आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles