आडाळी एमआयडीसीला अखेर मोठा दिलासा! भूखंडावरील स्थगिती उठली; गोल्फ कोर्स प्रकल्प रद्द, उद्योगांना चालना देण्यासाठी महत्त्वाचे ८ निर्णय.;  आमदार दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात विशेष बैठक.

मुंबई/ सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसीच्या विकासाला गती देण्यासाठी आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी विधान भवन येथे विशेष बैठक पार पडली. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या आग्रही मागणीनुसार आयोजित या बैठकीत आडाळी एमआयडीसी संदर्भातील अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
बैठकीत आडाळी एमआयडीसीमधील भूखंड वाटप, उद्योग सुरू करण्यास येणाऱ्या अडचणी, पायाभूत सुविधा तसेच नवीन गुंतवणूक आकर्षित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय :
भूखंडावरील स्थगिती उठविण्याचा निर्णय : यापूर्वी भूखंड ताबा देणे, करार करणे आणि बांधकाम परवानगी देण्यावर असलेली स्थगिती हटविण्यात आली. त्यामुळे संबंधित उद्योजकांना दिलासा मिळाला आहे.
नवीन भूखंडांसाठी ऑनलाइन प्रक्रिया : इच्छुक उद्योजकांसाठी भूखंड वाटपाची ऑनलाइन प्रक्रिया पुढील दोन आठवड्यांत सुरू करण्यात येणार असून नव्याने उद्योग उभारू इच्छिणाऱ्यांना त्यात सहभागी होता येणार आहे.
प्रस्तावित गोल्फ कोर्स प्रकल्प रद्द : आडाळी एमआयडीसी परिसरातील प्रस्तावित गोल्फ कोर्स प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
गोव्यात गुंतवणूक परिषद : आडाळी एमआयडीसीमध्ये अधिक उद्योग व गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी येत्या ऑगस्ट महिन्यात गोवा येथे गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे.
उद्योजकांसाठी आडाळीतच एमआयडीसी अधिकारी उपलब्ध : रत्नागिरीला वारंवार जावे लागू नये म्हणून दर गुरुवारी एमआयडीसीचे विभागीय अधिकारी आडाळी येथे उपस्थित राहून उद्योजकांची कामे मार्गी लावणार आहेत.
वीज वाहिनीचे काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देश : इन्सुली-आडाळी ३३ केव्ही पर्यायी वीजवाहिनीचे काम जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.
तिलारी पाण्यावर आधारित उद्योगांचा अभ्यास : तिलारी पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याचा वापर करून डेटा सेंटरसारखे उद्योग उभारण्याच्या शक्यतेचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
इतर समस्यांवर सकारात्मक निर्णय : आडाळी एमआयडीसीमधील विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करून उद्योगविकासाला चालना देण्याचे ठरविण्यात आले.
बैठकीला उद्योग विभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सह मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य अभियंता, उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे या ऑनलाइन माध्यमातून उपस्थित होत्या.
बैठकीनंतर आमदार दीपक केसरकर यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तातडीने बैठक घेऊन आडाळी एमआयडीसीच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी सांगितले की, या निर्णयांमुळे आडाळी एमआयडीसीला नवी चालना मिळून सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योगवाढ, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला मोठी गती मिळेल.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles