वारकरी संप्रदाय महाराष्ट्राच्या सामाजिक ऐक्याचा आणि मानवतेच्या मूल्यांचा अमूल्य ठेवा! : भाजपा युवा नेते विशाल परब. ; ‘राम कृष्ण हरी’च्या अखंड जयघोषात वझरेहून पंढरपूरकडे वारकऱ्यांचे भक्तिमय प्रस्थान! ; विशाल परब व वेदिकाताई परब यांनी घेतले दर्शन, दिल्या शुभेच्छा!

दोडामार्ग : “राम कृष्ण हरी… विठ्ठल विठ्ठल…” या अखंड नामघोषाने आणि टाळ-मृदंगाच्या निनादाने वझरे (ता. दोडामार्ग) परिसर रविवारी भक्तिरसात न्हाऊन निघाला. पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडी प्रस्थान सोहळ्याला उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. या प्रसंगी भाजप राज्य युवा नेते विशाल परब व सौ. वेदिकाताई परब यांनी उपस्थित राहून वारकऱ्यांचे दर्शन घेत त्यांना शुभेच्छा देत विठ्ठल चरणी सर्वांच्या सुख-समृद्धीची प्रार्थना केली.

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना विशाल परब म्हणाले, “वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा, सामाजिक ऐक्याचा आणि मानवतेच्या मूल्यांचा अमूल्य ठेवा आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव यांसारख्या संतांनी दिलेला समता, सेवा, भक्ती आणि बंधुभावाचा संदेश आजही समाजाला प्रेरणा देणारा आहे. ही समृद्ध संतपरंपरा जपणे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.”

वारकरी संप्रदाय हा केवळ धार्मिक प्रवास नसून श्रद्धा, शिस्त, सेवा, समता आणि बंधुभाव यांचे जिवंत प्रतीक मानला जातो. दरवर्षी लाखो वारकरी मुखी हरिनाम, हातात टाळ-मृदंग आणि हृदयात विठ्ठलभक्ती घेऊन पायी पंढरपूरची वारी करतात. समाजात प्रेम, सद्भावना आणि एकात्मतेचा संदेश देणारी ही परंपरा अनेक शतकांपासून अखंडपणे सुरू असून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख बनली आहे.

“राम कृष्ण हरी”च्या अखंड जयघोषात आणि विठ्ठल नामाच्या गजरात वारकऱ्यांनी पंढरपूरच्या दिशेने भक्तिभावाने प्रस्थान केले. यावेळी ग्रामस्थ, भाविक आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles