खड्ड्याने फोडला हात, तासभर प्रतीक्षा रुग्णालयात!, संतप्त इंजि. संजय परांजपे यांचा प्रशासनावर घणाघात! सावंतवाडी शहरात चाललंय तरी काय?

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील रस्त्याची दुरवस्था आणि उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत खासकीलवाडा येथील रहिवासी इंजि. संजय परांजपे यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर जोरदार टीका केली आहे. “शहरात रस्त्यांवर जीवघेणे खड्डे, तर रुग्णालयात वेळेवर उपचार नाहीत… अखेर सावंतवाडीकरांनी जगायचं तरी कसं?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

परांजपे यांनी सांगितले की, शहरातील रस्त्यांवर पडलेल्या मोठ्या खड्ड्यात मोटारसायकल घसरून त्यांचा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या उजव्या हाताचे हाड मोडले, तर डोक्यालाही गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गंभीर दुखापत असूनही उपचारासाठी तब्बल एक तास प्रतीक्षा करावी लागल्याचा आरोप त्यांनी केला.

त्यानंतर त्यांच्या विनंतीनुसार डोक्यावरील जखमेवर टाके घालण्यात आले आणि एक्स-रे करण्यात आला. ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉ. अवधूत यांनी तपासणीनंतर पुढील उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. मात्र, “जिल्हा रुग्णालयातही अशीच परिस्थिती असेल,” या भीतीने त्यांनी खाजगी रुग्णालयात दाखल होत शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला.

“उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचे काम केवळ रुग्णांना जिल्हा रुग्णालय किंवा बांबुळी येथे रेफर करणे एवढेच उरले आहे का?” असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला.

एकीकडे नगरपरिषदेतील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात टक्केवारीच्या आरोप-प्रत्यारोपांची धुरळेबाजी सुरू असताना, दुसरीकडे सामान्य नागरिक मात्र जीव मुठीत धरून खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शहरातील रस्त्यांवरील खड्डे आता अपघातांचे कायमस्वरूपी कारण ठरत असून, प्रशासन मात्र याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

याउलट, मागील दोन वर्षांत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहरातील अनेक खड्डे सिमेंट काँक्रीटने बुजविण्यात आल्याचे सांगत त्यांनी त्या उपक्रमाचे कौतुक केले. “सामाजिक संस्था काम करू शकते, मग निवडून दिलेले लोकप्रतिनिधी नेमके करतात तरी काय?” असा बोचरा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रवी जाधव, लक्ष्मण कदम आणि रूपा मुद्राळे यांनी खाजगी रुग्णालयात जाऊन संजय परांजपे यांची विचारपूस केली. त्यांच्या या संवेदनशीलतेबद्दल परांजपे यांनी त्यांचे आभार मानले.

दरम्यान, या घटनेमुळे सावंतवाडीतील रस्त्यांची दुरवस्था आणि आरोग्य यंत्रणेची कार्यक्षमता पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली असून, नागरिकांमधून तातडीने ठोस उपाययोजनांची मागणी जोर धरू लागली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles