सावंतवाडी : जनसेवेचा वसा आणि समाजहिताची अखंड ज्योत जपणारे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाच्या पवित्र महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. नगरसेवक देव्या सुर्याजी मित्रमंडळ आणि युवा रक्तदाता संघटना, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सामाजिक उपक्रमाला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत वाढदिवसाला सेवाभावाची अर्थपूर्ण किनार दिली.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले. रक्तदानासारख्या जीवनदायी कार्यातून समाजाप्रती आपली बांधिलकी व्यक्त करणाऱ्या रक्तदात्यांचे उपस्थितांनी कौतुक केले. तसेच रक्तपेढीचे अधिकारी प्रशांत सातार्डेकर, प्राजक्ता रेडकर, मानसी बागेवाडी, अनिल खाडे, गोविंद श्रीरामे, रवीना लोहंबरे आणि प्राची राणे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना संजू परब म्हणाले, “दीपक केसरकर हे सरळ, साधे, संयमी आणि कोणाच्याही वाईटाचा विचार न करणारे नेतृत्व आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या कार्याचे श्रेय कधीच स्वतःकडे घेतले नाही. जनतेच्या विश्वासाला न्याय देणारे असे नेतृत्व दुर्मीळ असून, त्यांना पुन्हा मंत्रीपदाची संधी मिळावी, हीच वाढदिवसानिमित्त सदिच्छा आहे.”
याप्रसंगी माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, महिला जिल्हाप्रमुख ॲड. नीता सावंत-कविटकर आणि प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप सावंत यांनीही मनोगत व्यक्त करत दीपक केसरकर यांच्या सामाजिक व विकासाभिमुख कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाला माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, महिला जिल्हाप्रमुख ॲड. नीता सावंत-कविटकर, शहरप्रमुख बाबू कुडतरकर, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप सावंत, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य तथा आमदार प्रतिनिधी देव्या सुर्याजी, नगरसेविका शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, स्नेहा नाईक, पंचायत समिती सदस्या प्रणाली टिळवे, सुप्रिता धारणकर, भारती परब, पूजा नाईक, शगुप्ता पडवेकर, शितल नाईक, निलम कुमठेकर, राजश्री निर्गुण, विश्वास घाग, गजानन नाटेकर, बासीत पडवेकर, युवा रक्तदाता संघटनेचे संदीप निवळे, वसंत सावंत, ॲड. प्रसाद नाटेकर, पंकज बिद्रे, क्रिश सावंत, भास्कर आमुणेकर, भगवत पोळ, मेहर पडते यांच्यासह अनेक मान्यवर आणि रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रक्तदानाच्या या प्रेरणादायी उपक्रमातून “वाढदिवस साजरा करण्यापेक्षा समाजासाठी जगणे अधिक महत्त्वाचे” हा संदेश प्रभावीपणे अधोरेखित झाला.



