सावंतवाडी : “गुरू हा केवळ ज्ञान देणारा शिक्षक नसतो, तर तो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारा शिल्पकार असतो. आपल्या आयुष्याची अनेक दशके विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समर्पित करणाऱ्या गुरुजनांमुळेच समाजाची वैचारिक आणि नैतिक पायाभरणी मजबूत होत असते. अशा ज्ञानयोगी, कर्तव्यनिष्ठ आणि त्यागमूर्ती गुरुजनांचा सन्मान करणे ही केवळ परंपरा नसून आपली सांस्कृतिक जबाबदारी आहे,” असे भावपूर्ण प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य युवा नेते विक्रांत सावंत यांनी केले.


गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त आरपीडी ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी येथे आयोजित “माजी गुरुजन सन्मान सोहळ्या”प्रसंगी ते कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. गेल्या तब्बल ५० वर्षांहून अधिक काळ शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना संस्कार, ज्ञान आणि जीवनमूल्यांची शिदोरी देणाऱ्या माजी प्राध्यापकांचा गौरव या सोहळ्यात करण्यात आला.
यावेळी विक्रांत सावंत म्हणाले की, “आरपीडी ही केवळ एक शिक्षणसंस्था नाही, तर हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आकार देणारे संस्कारमंदिर आहे. या संस्थेची यशस्वी परंपरा घडविण्यामागे माजी गुरुजनांचे अथक परिश्रम, निस्वार्थ समर्पण आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली अपार आत्मीयता कारणीभूत आहे. आज या ज्ञानतपस्वींचा सन्मान होताना आम्हा सर्वांना अभिमानासोबतच कृतज्ञतेचीही जाणीव होत आहे.”

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शालेय समिती अध्यक्ष अमोल सावंत, संस्थेचे सदस्य प्रा. सतीश बागवे, मुख्याध्यापिका संप्रवी कशाळीकर, प्रभारी मुख्याध्यापक डॉ. सुमेधा नाईक, पर्यवेक्षक नामदेव मुठे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘ह्या’ सत्कारमूर्तींचा झाला गौरव! –
या शानदार सोहळ्यात संस्थेचे उपाध्यक्ष तथा माजी प्राध्यापक डॉ. दिनेश नागवेकर, माजी उपप्राचार्य प्रा. नारायण देवरकर, प्रा. धीरेंद्र होळीकर, प्रा. सुरेश म्हसकर, प्रा. सतीश बागवे, माजी उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब नंदीहळ्ळी, प्रा. काकासाहेब चौगुले, प्रा. एल. पी. पाटील, प्रा. प्रवीण बांदेकर, प्रा. रवींद्र संकपाळ यांच्यासह माजी विद्यार्थी लक्ष्मण नाईक आणि सुर्वे सर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.


सत्काराला उत्तर देताना माजी प्राध्यापकांनी आरपीडीतील अध्यापनाचे दिवस, विद्यार्थ्यांशी असलेले भावनिक नाते आणि संस्थेच्या जडणघडणीतील अनेक संस्मरणीय प्रसंगांना उजाळा दिला. आजही संस्थेची सातत्याने होत असलेली प्रगती पाहून समाधान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या अनुभवकथनामुळे सभागृहातील वातावरण भावूक झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका संप्रवी कशाळीकर यांनी केले. प्रभारी मुख्याध्यापक डॉ. सुमेधा नाईक यांनी कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. सूत्रसंचालन प्रा. माया नाईक यांनी केले, तर प्रा. वामन ठाकूर यांनी आभार मानले.
या प्रसंगी विद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, हितचिंतक आणि शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुरुपौर्णिमा हा केवळ धार्मिक उत्सव नसून गुरू-शिष्य परंपरेच्या अमूल्य नात्याचा गौरव करणारा संस्कार सोहळा आहे. आधुनिक शिक्षणव्यवस्थेत तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढत असला तरी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य दिशा देणारा गुरू हा आजही केंद्रस्थानी आहे. आरपीडी ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित हा सन्मान सोहळा म्हणजे भूतकाळातील ज्ञानसेवेचा सन्मान, वर्तमानातील कृतज्ञतेची अभिव्यक्ती आणि भविष्यातील शिक्षणसंस्कारांची प्रेरणा ठरला. अशा कार्यक्रमांमुळे शिक्षकांविषयी आदराची भावना अधिक दृढ होते आणि नव्या पिढीसमोर आदर्श शिक्षणसंस्कृतीचा वारसा जपण्याचा प्रेरणादायी संदेश पोहोचतो.
https://www.instagram.com/reel/DbXjBE2RkX9/?igsh=cmRqZ2hybnJyeGtj
——————————–
https://www.instagram.com/reel/DbXo1UBR_vI/?igsh=MWd4NGFubnNkcW0yaA==



