सिंधुदुर्गनगरी : मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक तपासणीदरम्यान महामार्ग पोलिसाच्या अंगावर कार घालून सरकारी कामात अडथळा आणल्याच्या गंभीर आरोपातून अनंतराज नंदकिशोर पाटकर यांची अखेर निर्दोष मुक्तता झाली आहे. मे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश-१, सिंधुदुर्ग श्री. एस. टी. त्रिपाठी यांनी दि. ३१ जुलै २०२६ रोजी हा महत्त्वपूर्ण आदेश पारित केला.
या निकालामुळे २०१९ पासून न्यायालयीन प्रक्रियेत असलेल्या या प्रकरणाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. ठोस आणि विश्वासार्ह पुराव्यांच्या कसोटीवर आरोप सिद्ध न झाल्याने पाटकर यांना न्यायालयाकडून निर्दोष मुक्ततेचा दिलासा मिळाला.
पाच साक्षीदारांची साक्ष; मात्र आरोप सिद्ध करण्यात अपयश! –
या प्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ००६०/२०१९ अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७, ३५३ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फिर्यादीनुसार, दि. २२ सप्टेंबर २०१९ रोजी मुंबई-गोवा महामार्गावरील पिटढवळ नदी पुलाजवळ महामार्ग पोलीस वाहन तपासणी करीत असताना सीट बेल्ट न लावल्याने MH-०७-Q-९६१३ क्रमांकाची एर्टिगा कार थांबविण्यात आली होती. त्यावेळी चालक अनंतराज नंदकिशोर पाटकर यांनी पोलिसांशी वाद घातला आणि ई-चलनाची कारवाई सुरू असताना वाहन वेगाने चालवून फिर्यादी महामार्ग पोलीस अंकुश बाबू नाईक यांच्या अंगावर कार घातल्याचा तसेच सरकारी कामात अडथळा आणून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता.
मात्र, न्यायालयीन सुनावणीदरम्यान सरकार पक्षाने फिर्यादीसह एकूण पाच साक्षीदारांची साक्ष नोंदविली असतानाही, आरोपीचा कथित प्रत्यक्ष सहभाग आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप ठोस, विश्वासार्ह व पुरेशा पुराव्यांच्या आधारे सिद्ध करता आला नाही.
ॲड. अशपाक शेख यांचा युक्तिवाद ठरला निर्णायक! –
या प्रकरणात आरोपीच्या बचावाची बाजू अत्यंत प्रभावीपणे मांडण्याची जबाबदारी ॲड. अशपाक शेख यांनी सांभाळली. त्यांनी उपलब्ध साक्षी, कागदपत्रे आणि सरकार पक्षाच्या पुराव्यांमधील विसंगती यांचा बारकाईने ऊहापोह करत आरोप सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेली पुराव्यांची साखळी पूर्ण होत नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
ॲड. अशपाक शेख यांनी केलेला सखोल, मुद्देसूद आणि कायदेशीर तरतुदींवर आधारित युक्तिवाद या प्रकरणाच्या निकालाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला. सरकार पक्षाच्या पुराव्यातील उणिवा आणि विसंगती प्रभावीपणे अधोरेखित करत त्यांनी आरोपीची बाजू ठामपणे न्यायालयासमोर मांडली.
दोन्ही बाजूंचे युक्तिवाद, उपलब्ध पुरावे आणि संपूर्ण अभिलेख यांचा सखोल विचार केल्यानंतर मे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश-१, सिंधुदुर्ग श्री. एस. टी. त्रिपाठी यांनी अनंतराज नंदकिशोर पाटकर यांची निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश दिला.
कायदेशीर लढाईला समर्थ साथ! –
या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड. अशपाक शेख यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. नामदेव मठकर, ॲड. पंकज खरवडे, ॲड. विनय रजपूत, ॲड. कैस शेख आणि ॲड. भूषण कदम यांनी मोलाचे सहकार्य केले.
गंभीर आरोपांच्या सावटाखालील या प्रकरणात पुराव्यांची बारकाईने चिकित्सा करून, कायद्याच्या चौकटीत राहून आरोपीची बाजू प्रभावीपणे मांडण्याचे कौशल्य ॲड. अशपाक शेख यांनी दाखवून दिले. त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि भक्कम युक्तिवादामुळे बचाव पक्षाची बाजू प्रभावीपणे न्यायालयासमोर पोहोचली, अशी चर्चा या निकालानंतर कायदेवर्तुळात होत आहे.
आरोप कितीही गंभीर असले तरी ते न्यायालयात ठोस पुराव्यांनी सिद्ध होणे आवश्यक असते; आणि पुराव्यांच्या कसोटीवर सत्याचा विजय होतो, याचीच प्रचिती या निकालातून आली आहे.



