आंबोली : तळकोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या आंबोलीत सध्या मान्सून पर्यटनाचा हंगाम बहरात असताना महावितरणच्या कथित भोंगळ कारभाराचा फटका पर्यटन व्यावसायिकांना बसत आहे. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यास लागणारा विलंब आणि आवश्यक ‘परमिट’ मिळण्यात येणाऱ्या अडचणींमुळे हॉटेल व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. “महावितरणच्या कारभारामुळे आंबोलीतील पर्यटन व्यवसाय देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे,” असा गंभीर आरोप आंबोलीच्या माजी सरपंच तथा प्रशासक सौ. सावित्री पालेकर यांनी केला आहे.
आंबोलीला कोल्हापूर जिल्ह्यातून महावितरणची ३३ केव्ही वीजवाहिनी येते. आंबोली सबस्टेशनमधून पुढे ११ केव्हीची वीजवाहिनी आंबोली, गेळे आणि चौकूळ या तीन गावांना वीजपुरवठा करते. त्यानंतर विविध वाड्या, घरे तसेच हॉटेल व पर्यटन व्यवसायांना ट्रान्सफॉर्मरच्या माध्यमातून वीजपुरवठा केला जातो.
या तीनही गावांमध्ये सध्या कंत्राटी पद्धतीवर काम करणारे महावितरणचे चार कर्मचारी असून, वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. मात्र, एखाद्या ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला किंवा ११ केव्हीची वीजवाहिनी तुटली तर मुख्य वीजवाहिनी बंद अथवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले ‘परमिट’ कंत्राटी कर्मचाऱ्यांना देता येत नसल्याचे सांगितले जाते. परिणामी, जे दुरुस्तीचे काम तातडीने एका तासात होऊ शकते, त्यासाठी अनेकदा एक दिवस किंवा त्याहून अधिक कालावधी लागत आहे.
पर्यटन हंगामातच वीजेचा खेळखंडोबा!
आंबोलीत सध्या मान्सून पर्यटन हंगाम सुरू असून कर्नाटक, गोवा तसेच महाराष्ट्रातील विविध भागांतून मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत. मात्र, हॉटेल व रिसॉर्टमध्ये तासन्तास वीज नसल्याने पर्यटकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. काही पर्यटकांनी तर वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे आपली बुकिंग रद्द केल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
वीज नसल्याने हॉटेलमधील अन्नपदार्थ खराब होण्याचा धोका निर्माण होत असून, पर्यटकांना आवश्यक सुविधा देणे व्यावसायिकांसाठी कठीण होत आहे. परिणामी आंबोलीच्या पर्यटन व्यवसायाची प्रतिमा आणि स्थानिक व्यावसायिकांचे आर्थिक गणित दोन्ही बिघडत आहे.
‘स्वतःच्या कष्टाने उभा केलेला व्यवसाय अंधारात जाऊ देणार नाही!’
आंबोलीतील हॉटेल व पर्यटन व्यवसाय स्थानिक व्यावसायिकांनी स्वतःच्या मेहनतीने आणि मोठ्या आर्थिक गुंतवणुकीतून उभे केले आहेत. मात्र, वीजपुरवठ्यातील सातत्याने निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे त्यांच्या व्यवसायावर थेट परिणाम होत आहे. वीजपुरवठा सुरळीत न राहिल्यास पर्यटक परत येण्यास टाळाटाळ करतील आणि त्याचा मोठा फटका स्थानिक अर्थव्यवस्थेला बसू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.
कायमस्वरूपी वायरमनची तातडीची मागणी –
या पार्श्वभूमीवर आंबोलीच्या माजी सरपंच तथा प्रशासक सौ. सावित्री पालेकर यांनी आंबोली, गेळे आणि चौकूळ या तीनही गावांसाठी कायमस्वरूपी वायरमन उपलब्ध करून देण्याची प्रमुख मागणी केली आहे.
ट्रान्सफॉर्मर किंवा ११ केव्हीच्या वीजवाहिनीवर बिघाड झाल्यास तातडीने दुरुस्ती करता यावी, यासाठी संबंधित कर्मचाऱ्याला आवश्यक किमान ‘परमिट’ देण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
“महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार मागणी करूनही या गंभीर समस्येकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. पर्यटन हंगामातच वीजपुरवठ्याचा हा खेळखंडोबा सुरू राहिला तर स्थानिक व्यावसायिकांचे मोठे नुकसान होईल,” अशी भूमिका सावित्री पालेकर यांनी मांडली.
महावितरण कार्यालयावर धडक देण्याचा इशारा!
समस्या तातडीने मार्गी न लागल्यास आंबोली, गेळे आणि चौकूळ येथील नागरिक तसेच हॉटेल व्यावसायिक महावितरणच्या कार्यालयावर धरणे आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. याबाबतचा जाब आगामी ग्रामसभेतही विचारण्यात येणार आहे.
तसेच वीजपुरवठ्यातील वारंवारच्या व्यत्ययामुळे पर्यटन व्यावसायिकांचे जे आर्थिक नुकसान झाले आहे, त्या नुकसानीची भरपाई महावितरणकडून मागण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
आंबोलीसह गेळे आणि चौकूळ या पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या भागातील वीजव्यवस्था सक्षम करण्यासाठी महावितरणने तातडीने कायमस्वरूपी वायरमन उपलब्ध करून द्यावा आणि दुरुस्तीची यंत्रणा अधिक सक्षम करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक व पर्यटन व्यावसायिकांकडून होत आहे.



