गॉल : शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने श्रीलंका दौऱ्याची दणकेबाज सुरुवात करत गॉल येथील पहिल्या कसोटी सामन्यात 165 धावांनी विजय नोंदवला. अंतिम दिवशी श्रीलंकेला विजयासाठी कठीण आव्हान मिळाले होते, परंतु भारतीय गोलंदाजांच्या शिस्तबद्ध आणि भेदक माऱ्यासमोर यजमान संघाचा दुसरा डाव 206 धावांवर आटोपला. या विजयासह भारताने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही आपले स्थान अधिक मजबूत केले आहे.
WTC गुणतालिकेत भारताला 12 गुणांचा फायदा –
श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीतील विजयामुळे भारताच्या खात्यात 12 गुणांची भर पडली आहे. सामन्यापूर्वी भारताचे 52 गुण होते. आता हे गुण 64 झाले आहेत. तसेच भारताची विजयाची टक्केवारी म्हणजेच पीसीटी 48.15 टक्क्यांवरून 53.33 टक्क्यांवर पोहोचली आहे. मात्र या शानदार विजयानंतरही डब्ल्यूटीसी गुणतालिकेत भारताच्या स्थानात बदल झालेला नाही. टीम इंडिया पाचव्या स्थानावरच कायम आहे.
पहिल्या डावात पडिक्कलचा धडाका –
भारताने पहिल्या डावात 462 धावा केल्या. या डावात देवदत्त पडिक्कलने शानदार फलंदाजी करत 167 धावांची दमदार खेळी केली. त्याच्या संयमी आणि आक्रमक फलंदाजीमुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली. केएल राहुलने 81 धावा, ध्रुव जुरेलने 51 धावा, तर ऋषभ पंतने 39 धावांचे योगदान दिले. श्रीलंकेकडून प्रभात जयसूर्याने 4 विकेट घेतल्या, तर केशरा नुवान्थाने 3 फलंदाजांना बाद केले.
श्रीलंकेचा पहिला डाव 284 धावांवर आटोपला –
भारताच्या 462 धावांच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेचा पहिला डाव 284 धावांवर संपुष्टात आला. डिकवेलाने 115 चेंडूंचा सामना करत 7 चौकारांच्या मदतीने 80 धावा केल्या. तर दिनुषाने तब्बल 168 चेंडूंत 100 धावांची शतकी खेळी साकारली. त्याच्या खेळीत 4 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. मात्र भारताकडून मानव सुथारने सर्वाधिक 4 विकेट्स घेत श्रीलंकेच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. रवींद्र जडेजाने 3 विकेट्स घेत त्याला उत्तम साथ दिली. मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि कुलदीप यादव यांच्या खात्यात प्रत्येकी एक विकेट जमा झाली. भारताने पहिल्या डावात केलेल्या 462 धावांच्या जोरावर तब्बल 178 धावांची आघाडी मिळवली आहे.
https://youtube.com/shorts/4BKCac17NOc
दुसऱ्या डावात पंतचा जलवा –
भारताने दुसऱ्या डावात 193 धावा केल्या. भारतासाठी ऋषभ पंतने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 69 चेंडूंमध्ये आठ चौकार आणि दोन षटकारांसह 66 धावा केल्या. देवदत्त पडिक्कलनेही 44 धावा केल्या. यशस्वी जैस्वालला आपले खाते उघडता आले नाही. केएल राहुलने पडिक्कलसोबत 65 धावांची भागीदारी केली. राहुल 35 धावांवर बाद झाला. कर्णधार शुभमन गिल विशेष प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला आणि आठ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. श्रीलंकेसाठी असिथा फर्नांडोने चार बळी घेतले. प्रभात जयसूर्यानेही तीन बळी घेतले. लाहिरू कुमारने दोन बळी घेतले. केशरा नुवान्थाने एक बळी घेतला.
अखेर श्रीलंकेचा डाव 206 धावांवर संपला –
भारताने दिलेल्या 372 लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने दुसऱ्या डावात चांगली झुंज देण्याचा प्रयत्न केला. सोनल दिनुशाने 84 धावा केल्या, तर धनंजया डी सिल्वाने 59 धावांची खेळी करत प्रतिकार केला. मात्र भारतीय गोलंदाजांनी निर्णायक क्षणी विकेट्स मिळवत श्रीलंकेला पुनरागमनाची संधी दिली नाही. मानव सुथारने पुन्हा एकदा प्रभावी गोलंदाजी करत 5 विकेट्स घेतल्या, तर प्रसिद्ध कृष्णाने 2 विकेट्स मिळवल्या. अखेर श्रीलंकेचा संपूर्ण डाव 206 धावांवर संपला आणि भारताने सामना 165 धावांनी जिंकला.
https://youtube.com/shorts/N9DNckav2XI



