कोल्हापूर : सावंतवाडीच्या आरोग्यव्यवस्थेला नवसंजीवनी देणाऱ्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेचा न्यायालयीन तिढा अखेर सुटला असून, हॉस्पिटलच्या प्रत्यक्ष कामाला आता वेग येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचवेळी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील ट्रामा केअर युनिट अधिक सक्षम करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने आरोग्य विभागाला महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत.
अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्गने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती नीरज धोटे आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी फाऊंडेशनच्या वतीने अॅड. महेश राऊळ, अॅड. मिहीर मोंडकर आणि अॅड. नीरज लवटे यांनी बाजू मांडली. सरकारच्या वतीने सरकारी वकील विकास माळी व श्री. हिरे यांनी युक्तिवाद केला.
जागेचा वाद मिटला; हॉस्पिटलच्या कामाचा मार्ग प्रशस्त
अभिनव फाऊंडेशनच्या जनहित याचिकेच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन न्यायमूर्ती कर्णिक यांनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेसंदर्भातील द्वितीय अपील जलदगतीने निकाली काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राजघराण्यातील दोन्ही कुटुंबांमध्ये तडजोड होऊन जागेच्या वादाचे द्वितीय अपील निकाली निघाले आहे.
त्यामुळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या कामासाठी असलेला मोठा अडथळा दूर झाला असून, लवकरच हॉस्पिटलच्या कामाला सुरुवात होईल, अशी माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयात दिली. यासंदर्भात पुढील कार्यवाही वेगाने करण्याची तयारी आरोग्य विभागाने दर्शवली आहे.
ट्रामा केअरला तज्ज्ञ डॉक्टर; डॉ. सचिन बळवंतेंची प्रतिनियुक्ती
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील ट्रामा केअर युनिटसाठी अस्थिव्यंग तज्ज्ञ डॉ. सचिन बळवंतेंची तातडीने प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अपघातग्रस्त तसेच अस्थिव्यंगाशी संबंधित रुग्णांना तातडीची वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
सी-आर्म मशीन ८ आठवड्यांत; आवश्यक यंत्रसामग्री ४ आठवड्यांत
न्यायालयाने आरोग्य विभागाला स्पष्ट वेळमर्यादा घालून दिली आहे. ट्रामा केअर युनिटसाठी आवश्यक वैद्यकीय यंत्रसामग्री चार आठवड्यांत खरेदी करावी, तर शस्त्रक्रियेसाठी अत्यावश्यक असलेले सी-आर्म मशीन आठ आठवड्यांत उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश देण्यात आले.
या संपूर्ण प्रक्रियेत आरोग्य संचालकांनी स्वतः लक्ष घालावे, तसेच पुढील सुनावणीवेळी आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची माहिती सादर करावी, असेही न्यायालयाने निर्देश दिले.
रिक्त वैद्यकीय अधिकारी पदे सहा महिन्यांत भरणार!
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदांचा प्रश्नही न्यायालयीन सुनावणीत ऐरणीवर आला. आरोग्य विभागाच्या वतीने आगामी सहा महिन्यांत रिक्त वैद्यकीय अधिकारी पदे भरण्याचे आश्वासन देण्यात आले.
राज्यातील १,४४० वैद्यकीय अधिकारी पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली असून भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या प्रक्रियेतून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला आवश्यक वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती आरोग्य विभागाने न्यायालयाला दिली.
समितीच्या अहवालावरही न्यायालयाचे लक्ष
अभिनव फाऊंडेशनचे वकील अॅड. महेश राऊळ यांनी कोल्हापूर उपसंचालकांच्या नेतृत्वाखालील चार सदस्यीय समितीचा अहवाल न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. ऑक्टोबर २०२६ मध्ये अहवाल सादर होऊनही त्यावर अद्याप अपेक्षित कार्यवाही झालेली नाही, याकडे त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.
यावर न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी अहवालात नमूद केलेली आवश्यक वैद्यकीय यंत्रसामग्री निर्धारित कालावधीत उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
सावंतवाडीच्या आरोग्यसेवेसाठी निर्णायक टप्पा!
मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेचा वाद मिटणे, ट्रामा केअर युनिटसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती, अत्यावश्यक यंत्रसामग्रीची खरेदी आणि रिक्त वैद्यकीय अधिकारी पदे भरण्याच्या हालचाली सुरू होणे, या सर्व घडामोडींमुळे सावंतवाडीच्या आरोग्यसेवेला मोठी चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्गच्या जनहित याचिकेवरील सुनावणीस आरोग्य समितीचे अध्यक्ष एन. बी. रेडकर, तेजल परब आणि राहुल परब उपस्थित होते.
एकूणच, वर्षानुवर्षे रखडलेल्या आरोग्य सुविधांना आता न्यायालयीन निर्देशांची साथ मिळाल्याने सावंतवाडीच्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा मार्ग मोकळा झाला असून, “हॉस्पिटल कधी होणार?” या नागरिकांच्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.



