सावंतवाडीला ‘इको सेन्सिटिव्ह झोन’मधून वगळण्यासाठी ठराव! : नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांची माहिती. ; लाकडी खेळणी, गंजीफाला युनेस्कोच्या सांस्कृतिक वारशाचा दर्जा मिळवून देण्यासाठीही पालिकेचा पुढाकार!

सावंतवाडी : सावंतवाडी शहराचा इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये समावेश झाल्यास शहराच्या विकासावर विविध प्रकारची बंधने येण्याची शक्यता असल्याने सावंतवाडी शहराला इको सेन्सिटिव्ह झोनमधून वगळण्यात यावे, यासाठी विशेष सभेत ठराव घेण्यात आला आहे. हा ठराव शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आयुष मंत्रालयाच्या ओपीडीसाठी आवश्यक असलेली वीज, पाणी आणि टॅक्सची सुविधा त्यांच्या मागणीनुसार मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णयही सभेत घेण्यात आला आहे. त्याबदल्यात शहरवासीयांना केस पेपरची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात यावी, असा ठराव करण्यात आल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.

सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांना मिळणार जागतिक ओळख?

सावंतवाडीची पारंपरिक ओळख असलेल्या लाकडी खेळणी आणि गंजीफा कलेला युनेस्कोच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसा मानांकन मिळावे, यासाठी प्रस्ताव पाठविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय विशेष सभेत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सावंतवाडीच्या पारंपरिक कला-कौशल्याला जागतिक व्यासपीठ मिळण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे.

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी पालिकेचे पूर्ण सहकार्य

सावंतवाडीतील प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल याच जागेवर उभारले जावे, यासाठी नगरपरिषदेने संपूर्ण सहकार्य केले आहे. युवराज लखमराजे भोंसले स्वतः या विषयात लक्ष घालत असून, आवश्यक सर्व कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. आता न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा असल्याचे श्रद्धाराजे भोंसले यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सिंधुदुर्गात ताज पंचतारांकित हॉटेल होत असल्याने जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दोन महिन्यांत पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळणार?

विशेष सभेला मुख्याधिकारी अनुपस्थित राहिल्याबाबत विचारले असता, सावंतवाडी नगरपरिषदेला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळावा, यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधण्यात आले असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.

मुख्याधिकाऱ्यांकडे अतिरिक्त पदभार असल्याने सावंतवाडीला आवश्यक वेळ देणे शक्य होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एसआयआरमुळे ही प्रक्रिया थांबली होती; मात्र पुढील दोन महिन्यांच्या आत सावंतवाडीला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळेल, असा विश्वासही नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोंसले यांनी व्यक्त केला.

इको सेन्सिटिव्ह झोनपासून सावंतवाडीला दिलासा, पारंपरिक कलेला जागतिक व्यासपीठ, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी न्यायालयीन निर्णयाची प्रतीक्षा आणि पूर्णवेळ मुख्याधिकाऱ्याची आशा—या सर्व मुद्द्यांमुळे नगरपरिषदेची विशेष सभा चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles