सावंतवाडी : मराठी भाषा, ज्ञान आणि वाचनसंस्कृतीचा जागर घडविणाऱ्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या राज्यस्तरीय ऑनलाइन विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत राज्य, जिल्हा आणि तालुकास्तरावर आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे. या दैदिप्यमान यशामुळे RPD प्रशालेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधून तब्बल १८०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेल्या या स्पर्धेत RPDच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. राज्यस्तरीय शहरी गटात कु. अश्लेषा उद्धव माळवे (इयत्ता ९ वी) आणि कु. सृष्टी गोविंद परब (इयत्ता ९ वी) यांनी संयुक्तपणे चौथा क्रमांक पटकावला. त्यांना ७,५०० रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

याच गटात कु. सोहम बापूशेट कोरगावकर याने पाचवा क्रमांक मिळवत प्रशालेच्या यशात भर घातली. त्याला ५,००० रुपये व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. ठाणे येथे आयोजित कार्यक्रमात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते राज्यस्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
जिल्हास्तरावरही RPDचा झेंडा!
जिल्हास्तरीय शहरी गटातही RPDच्या विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली.
तेजस्वी सगम — प्रथम क्रमांक
अमेय आपटे — द्वितीय क्रमांक
साक्षी गुरव — तृतीय क्रमांक
अशी उल्लेखनीय कामगिरी विद्यार्थ्यांनी केली.
तालुकास्तरावरही RPDचे वर्चस्व
तालुकास्तरीय शहरी गटातही RPDच्या विद्यार्थ्यांनी अव्वल कामगिरी करत यशाची मालिका कायम ठेवली.
शमिका केदार व महादेव परब — प्रथम क्रमांक
जान्हवी मेस्त्री — द्वितीय क्रमांक
अथर्व देवस्थळी — तृतीय क्रमांक
अशा प्रकारे तालुकास्तरावरही RPDच्या विद्यार्थ्यांनी मानाचे स्थान पटकावले.
‘जीवसृष्टी आणि पर्यावरण’ विषयावर ज्ञानाची कसोटी
मराठी भाषा आणि ज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेसाठी मराठी विश्वकोशातील ‘जीवसृष्टी आणि पर्यावरण’ या विषयावरील नोंदी अभ्यासक्रम म्हणून देण्यात आल्या होत्या. १०० गुणांच्या परीक्षेत ५० वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश होता. या कठीण स्पर्धेत राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये RPDच्या विद्यार्थ्यांनी केलेली दमदार कामगिरी विशेष कौतुकास्पद ठरली.
राज्यस्तरावर अनुक्रमे १५ हजार, १२ हजार ५००, १० हजार, ७ हजार ५०० आणि ५ हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. जिल्हास्तरीय विजेत्यांना सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते लवकरच समारंभपूर्वक बक्षिसे व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळाचे सदस्य वामन पंडित यांनी दिली.
RPDच्या यशाचा सर्व स्तरातून गौरव
या उल्लेखनीय यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विक्रांत सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष अमोल सावंत तसेच संस्थेच्या सर्व सदस्यांनी विद्यार्थ्यांचे, पालकांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
मुख्याध्यापक श्रीमती संप्रवी कशाळीकर, प्रभारी मुख्याध्यापक डॉ. सुमेधा नाईक, प्रभारी उपप्राचार्य श्रीमती सविता माळगे-कांबळे, पर्यवेक्षक एन. जी. मुठे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक-शिक्षक संघानेही गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
राज्यस्तरापासून तालुकास्तरापर्यंत ज्ञानाच्या मैदानात RPDच्या विद्यार्थ्यांनी उमटविलेला हा ठसा म्हणजे सावंतवाडीच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.



