पाचगणीत रंगला उमविच्या माजी ‘एनएसएस’ विद्यार्थ्यांचा धमाकेदार स्नेहमेळावा! ; योगसत्र, १५० किलो कचऱ्याची सफाई अन् सांस्कृतिक जल्लोष!, ‘स्वच्छ पांचगणी, सुंदर पांचगणी’चा घुमला संदेश!

महाबळेश्वर : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) माजी विद्यार्थ्यांचा ‘गेट टूगेदर २०२६ – वर्ष २ रे’ हा स्नेहमेळावा महाबळेश्वर-पाचगणीच्या निसर्गरम्य वातावरणात उत्साह, आठवणी आणि सामाजिक बांधिलकीच्या अनोख्या संगमात दणक्यात पार पडला. २२ व २३ ऑगस्ट रोजी झालेल्या या दोन दिवसीय मेळाव्यात जुन्या एनएसएस शिबिरांच्या आठवणींना उजाळा मिळतानाच सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांनी कार्यक्रमाला आगळेवेगळे स्वरूप प्राप्त झाले.

या स्नेहमेळाव्याचे संयोजन अध्यक्ष सय्यद मुस्ताक, खजिनदार विनायक महाजन, सल्लागार डॉ. मुकेश कुलकर्णी, उपाध्यक्ष सुबोधकुमार पाटील आणि मनीषा मानकर यांनी केले. मेळावा यशस्वी करण्यासाठी नियोजन समितीच्या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी १५ स्वयंसेवक आणि १० महिला स्वयंसेवक सहभागी झाले होते.

योगसाधनेपासून स्वच्छता मोहिमेपर्यंत सामाजिक बांधिलकीचा जागर!

मेळाव्याची सुरुवात विद्यापीठातील एनएसएस शिबिरांच्या जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या सत्राने झाली. सकाळच्या सत्रात योगगुरू डॉ. भालचंद्र यांनी उपस्थितांसाठी योगसत्र घेत आरोग्य आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश दिला.

यानंतर पाचगणी नगरपरिषद आणि नेस्ले प्रणित हिलदरी अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने, डॉ. मुकेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सिडनी पॉईंट परिसरात श्रमदान व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेत माजी एनएसएस स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत तब्बल १५० किलोपेक्षा अधिक कचरा गोळा केला. निसर्गरम्य पाचगणीच्या स्वच्छतेसाठी हातात झाडू घेतलेल्या या माजी विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छ पांचगणी, सुंदर पांचगणी’चा प्रभावी संदेश दिला. केवळ आठवणींमध्ये रमण्याऐवजी समाज आणि पर्यावरणाप्रती आपली जबाबदारी जपण्याचा आदर्श या उपक्रमातून त्यांनी घालून दिला.

शेरो-शायरी, शाहिरी अन् ‘धकधक गर्ल’च्या अदाकारीने रंगली मैफल!

दुपारच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम, स्वयंसेवकांचा सत्कार आणि उपस्थितांचे मनोगत यामुळे स्नेहमेळाव्याला रंगत आली. जुन्या आठवणींना उजाळा देताना माजी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि एनएसएसच्या काळातील आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ‘बेताब बादशहा’ दिलशाद शेख यांची दमदार शेरो-शायरी आणि शाहिरी. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. त्याचबरोबर आपल्या मनमोहक अदाकारीने उपस्थितांना मंत्रमुग्ध करणाऱ्या ‘धकधक गर्ल’ कांचन पडळकर (ऐश्वर्या) यांच्या नृत्याने कार्यक्रमात रंगत आणखी वाढवली.

आठवणींच्या हिंदोळ्यावर सामाजिक संदेशाचीही जोड!

स्नेह, जुन्या आठवणी, सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि सांस्कृतिक जल्लोष यांचा सुरेख मिलाफ साधणारा हा स्नेहमेळावा उपस्थितांच्या मनात कायमच्या आठवणी ठेवून गेला. एनएसएसने दिलेली ‘सेवा’ आणि ‘समाजासाठी काहीतरी करण्याची’ शिकवण आजही माजी स्वयंसेवकांच्या मनात जिवंत असल्याचे या मेळाव्यातून प्रकर्षाने दिसून आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी नियोजन समितीचे कौतुक केले. आभार प्रदर्शन खजिनदार विनायक महाजन यांनी केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles