सावंतवाडी : श्रावणाच्या रिमझिम सरींमध्ये सुरांची बरसात अनुभवायला मिळावी आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने राणी पार्वतीदेवी ज्युनिअर कॉलेजच्या नवरंग कलामंचावर ‘श्रावणधारा’ या बहारदार संगीत कार्यक्रमाचे आयोजन दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या गायन-वादन कौशल्याचा सुरेल आविष्कार आणि सुमधुर गीतांच्या मैफलीने नवरंग कलामंच अक्षरशः सुरांनी न्हाऊन निघाला.
विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास हे नवीन शैक्षणिक धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट लक्षात घेऊन गायन व वादन कलेत प्रावीण्य असलेल्या विद्यार्थ्यांना सादरीकरणाची संधी देण्यात आली. श्रावण म्हणजे नवनिर्मिती, चैतन्य आणि पर्जन्यसरींच्या उत्साहाचा महिना. याच भावनेला साजेसे असे अभंग, भावगीत, श्रावणगीते आणि लोकप्रिय सिनेगीतांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी आपल्या सुमधुर आवाजात केले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी व्यासपीठावर प्रभारी मुख्याध्यापिका डॉ. सुमेधा नाईक, प्रभारी उपप्राचार्य प्रा. सविता माळगे, सांस्कृतिक कमिटी प्रमुख माया नाईक, प्रा. वामन ठाकूर, प्रा. पुनम वाडकर यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते.
🎼 तबल्याच्या ठेक्यावर अन् सुरांच्या लयीवर रंगली मैफल!
तबलावादक मेस्त्री बंधूंनी आपल्या दमदार तबलावादनाने कार्यक्रमात रंगत आणली. त्यांना पियानोवादक तुळसकर यांची लाभलेली सुरेल साथ मैफलीची रंगत अधिकच वाढवणारी ठरली.
एकूण ४५ विद्यार्थी गायकांनी विविध गीतप्रकार सादर करत उपस्थितांची मने जिंकली. गौरव लाखे आणि पद्मश्री पास्ते यांनी सादर केलेल्या ‘सावन आया है’ आणि ‘रिमझिम गिरे सावन’ या श्रावणगीतांना रसिकांकडून विशेष दाद मिळाली.
कोमल परबचे ‘त्या वाटेवरी मोगरा’, कस्तुरी तुळसकरचे ‘मी वनांतरी’ तसेच प्रीती नाईक आणि इतर विद्यार्थ्यांच्या सुमधुर गीतांनी नवरंग कलामंच अक्षरशः दणाणून सोडला.
🌧️ माजी विद्यार्थ्यांच्या सुरांनीही रंगली ‘श्रावणधारा’!
कार्यक्रमात ज्युनिअर कॉलेजचे माजी विद्यार्थी कु. श्रीपाद कवठणकर आणि कु. पूर्वा धाकोरकर यांनीही आपल्या सुरेल गीतांनी उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या सादरीकरणामुळे कार्यक्रमाच्या उत्साहात आणखी भर पडली आणि नवरंग कलामंचावर जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.
✨ ताण विसरून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटला आनंद!
अभ्यासाचा ताण काही काळ बाजूला ठेवून विद्यार्थ्यांच्या मनात उत्साह, चैतन्य आणि आनंदाची उधळण करण्याचा उद्देश ‘श्रावणधारा’ या कार्यक्रमातून सफल झाला. संगीताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासोबतच त्यांच्या आत्मविश्वासालाही नवी झळाळी मिळाली.
ज्युनिअर कॉलेजच्या सांस्कृतिक विभागाने उत्कृष्ट नियोजन व आयोजन करत हा अविस्मरणीय संगीत सोहळा यशस्वी केला. श्रावणाच्या सरींसोबत बरसलेल्या सुरांनी ‘श्रावणधारा’ कार्यक्रमाची गोड आठवण विद्यार्थ्यांच्या मनात कायमची कोरली.



